झेवियर कॉलेजमधील प्रकाराची होणार चौकशी!

मुख्यमंत्री : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत चौकशी, जिल्हाधिकाऱ्यांनी मामलेदारांकडून मागवला अहवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : विद्यार्थी परिषद समितीची स्थापना करून अधिकारग्रहण सोहळा करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) झेंड्याखाली विद्यार्थ्यांनी म्हापशातील सेंट झेवियर कॉलेजमध्ये शनिवारी तब्बल चार तास आंदोलन केले. यावेळी आंदोलक व कॉलेजच्या प्राध्यापकांत बाचाबाची झाली होती. या प्रकरणाची उच्च शिक्षण संचालनालयामार्फत चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी स्पष्ट केले. सेंट झेवियर कॉलेजमध्ये शनिवारी झालेल्या प्रकाराची शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

या घटनेवरून आता अभाविप आणि काँग्रेसच्या एनएसयूआय संघटनांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामुळे हा विषय धगधगत चालला आहे. सेंट झेवियर महाविद्यालयामधील तणावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जबाबदार आहेत, असा आरोप एनएसयूआय संघटनेचे गोवा अध्यक्ष नौशाध चौधरी यांनी केला आहे. तर, सेंट झेवियर महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि व्यवस्थापक हुकूमशाही चालवत आहेत, असा आरोप अभाविपचे गोवा सरचिटणीस साहिल महाजन यांनी केला आहे. या दोन्ही संघटनांमध्ये सोमवारी जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसून आले.

हेही वाचाः चांदर रेल्वे आंदोलनप्रकरणी पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला

उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी सेंट झेवियर महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराचा अहवाल बार्देशच्या मामलेदारांकडून मागवला आहे. प्राचार्यांनी अभाविपच्या विद्यार्थ्यांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळेच आंदोलक संतप्त बनले. यातून तणाव निर्माण झाला, असा दावा संघटनेच्या वतीने केला जात आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने वर्ग बंद केले. प्रयोगशाळेत घुसून प्रात्यक्षिक वर्ग बंद केले, असा आरोप महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने केला आहे. आता मामलेदारांकडून येणाऱ्या अहवालातून सत्य समोर येईल.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनात महाविद्यालयाचे काही विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांवर महाविद्यालय व्यवस्थापनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण संचालनालय सेंट झेवियर महाविद्यालयातील प्रकरणाची चौकशी करणार आहे, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणालेत.

विद्यार्थी मंडळ त्वरित स्थापन करा : अभाविप

सेंट झेवियर महाविद्यालयातील विद्यार्थी मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन ७५ दिवस उलटले आहेत. तरीही मंडळाची स्थापना करण्यात आलेली नाही. महाविद्यालयाचे प्राचार्य हुकूमशहा असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी त्वरित विद्यार्थी मंडळाची स्थापना करावी, अशी मागणी अभाविपने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

हेही वाचाः Drugs | डफल बॅगमधून घेऊन जात होता कोकेन, कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!