खतांवरील अनुदान वाढवण्याचा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : येत्या खरीप हंगामासाठी डीएपी आणि इतर पी व के खतांवरील अनुदान वाढवल्याबद्दल केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या वाढीव अनुदानाचा भरीव फायदा लाखो शेतकऱ्यांना होईल, असे ते म्हणाले.

.. या खतांच्या किंमतीवरील नियंत्रण काढून टाकले

फॉस्फेटिक व पोटॅशिक खतांच्या किंमतीवरील नियंत्रण काढून टाकले असून उत्पादकांना त्यांच्या मतानुसार किंमती (MRP) ठरवण्याची मुभा दिली गेली आहे. गेल्या काही महिन्यांत डाय अमोनियम फॉस्फेट ( DAP) सारख्या तयार खतांच्या व त्यासाठी लागणाऱ्या फॉस्फोरीक आमल, अमोनिया, व सल्फरसारख्या कच्च्या मालाच्या किमतींत आंतरराष्ट्रीय स्तरावर 60 ते 70 टक्के इतकी प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे या खतांच्या देशांतर्गत किमती देखील वाढू लागल्या होत्या. एप्रिल महिन्यात डीएपी खताची एक पिशवी रू. 1900 इतक्या वाढीव किमतीला मिळत होती. मार्च मध्ये याच पिशवीची किंमत रू 700 होती. त्याचप्रमाणे इतर फॉस्फेटिक व पोटॅशिक खतांच्या किमती देखील सुमारे 50 टक्क्यांनी वाढल्या होत्या. ही खते शेतीसाठी अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती.

अनुदानासाठी सरकार  14,775 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार

शेतकऱ्यांची ही अडचण सोडवण्यासाठी सरकारने त्वरित पुढाकार घेतला. 19 मे 2021 रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यात पंतप्रधानांनी फॉस्फेटिक व पोटॅशिक खतांच्या किंमती वाढवू नयेत, असे निर्देश दिले. कोविड महामारीच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी वाढीव किमतीचा अतिरिक्त भार या खरीप हंगामासाठी सरकार स्वीकारेल, अशी घोषणा केली आहे. येत्या खरीप हंगामात या अनुदानासाठी सरकार  14,775 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!