हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका, नव्याने अध्यादेश काढून निवडणुका घ्या

पालिका प्रशासनाला नव्याने निवडणुका प्रक्रिया करण्याचे आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः नगरपालिका निवडणूक राखीवता अधिसूचना अखेर रद्दबातल करण्यात आलीये. ४ फेब्रुवारीला नगरपालिका आरक्षणाची ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. गोवा नगरपालिका निवडणुकांसाठी गोवा सरकारने अधिसूचित केलेले प्रभाग आरक्षण व प्रभागांची फेररचना याला आव्हान देणार्‍या याचिकांवरील सुनावणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पूर्ण झाली होती. यावेळी न्यायालयाने या याचिकांवरील निवाडा मात्र राखून ठेवला होता.

महत्त्वाचा निकाल

पालिका आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही. किंबहुना आरक्षणातील विसंगती दूर करण्यासही सांगू शकत नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी उच्च न्यायालयात दिलं होतं. त्यानंतर न्यायालयाने पालिका प्रभाग फेररचना आणि आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवरील निवाडा राखून ठेवला. सोमवारी नगरपालिका निवडणूक राखीवता अधिसूचनेबद्द अखेर उच्च न्यायालयाने निर्णय घेतला. ही अधिसूचना रद्दबातल करून उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.

court-hammer 800X450

नव्याने निवडणुका जाहीर करण्याचे आदेश

नगरपालिका निवडणूक राखीवता अधिसूचना अखेर रद्दबातल करण्यात आल्यानंतर निवडणूक प्रक्रिया नव्याने करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले आहेत. यासाठी पालिका प्रशासनाला १० दिवसांची मुदत देण्यात आलीये. १५ एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आलेत. मडगाव, मुरगाव, सांगे, केपे आणि म्हापसा पालिकेसाठी हे आदेश लागू आहेत.

निवडणूक आयोगाला दणका

न्यायालय काय निवाडा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, पालिका निवडणुकांसाठी सरकारने जाहीर केलेलं आरक्षण, याचिका न्यायालयात असताना रात्रीच जारी केलेली अधिसूचना आणि याचिका सुनावणीला आल्यानंतर लगेचच जाहीर केलेल्या तारखा यावरून उच्च न्यायालयाने याआधी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यानंतर आरक्षणातील विसंगतीही निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान सोमवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वाच्या निकालामुळे निवडणूक आयोगाला मोठा दणका मिळाला आहे.

गेल्या सोमवारी सुनावलं, या सोमवारी दणका

गेल्या सोमवारीच हायकोर्टानं निवडणूक आयोगाला सुनावलं होतं. गेल्या सोमवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्याकेल्याच हायकोर्टानं निवडणुकाला झापलं होतं. प्रलंबित याचिकांवरील सुनावण्या सुरु असताना घाईघाईनं निवडणुका जाहीर केल्यावर नाराजी व्यक्त केली होती.

विरोधकांची टीका

दरम्यान, हायकोर्टानं आज दिलेला निकाल हा भाजप संपण्याच्या मार्गावर असल्याची सुरुवात असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!