आरोग्यमंत्र्यांनी आयव्हरमेक्टिन घोटाळ्यासाठी गोंयकारांची, काँग्रेसची माफी मागावी

काँग्रेसची मागणी; भाजप सरकारने कोविड रुग्णांची हत्या केली म्हणत केला आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्यातील भाजप सरकारने २८४० कोविड रुग्णांची आजपर्यंत हत्या केली हे आता स्पष्ट झालं आहे. सरकारकडून ही आकडेवारी अधिकृतरीत्या आता जाहीर झालेली असली, तरी मार्च २०२० पासून गोव्यातील सर्व मृत्यूंची तसंच सरकारच्या कोविड हाताळणी आणि व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी काँग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचाः नरदेव पाहिजे पण कोव्हिशिल्ड लस घेतलेलाच…

मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पदाचा राजीनामा द्यावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा देऊन निष्पक्ष न्यायालयीन चौकशीसाठी वाट मोकळी करावी. गोमंतकीयांच्या आरोग्याशी खेळून सरकारला चुकीचे सल्ले देणारी आरोग्यमंत्र्यांनी गठन केलेली तज्ज्ञांची समिती त्वरित बरखास्त करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आयव्हरमेक्टिन घोटाळ्यासाठी गोमंतकीय तसंच काँग्रेस पक्षाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केलीये. पत्रकार परिषदेला महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर तसंच सेवा दल प्रमुख शंकर किर्लपारकर हजर होते.

हेही वाचाः राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना केंद्राकडून जाहीर

कोविड आकडेवारी, मृतांचा आकडा यात सरकारने घातला घोळ

कोविड संसर्गाची लागण झालेल्यांची आकडेवारी आणि मृतांचा आकडा यात सरकारने सुरुवातीपासून घोळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी नसताना सरकारने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्याचं ठरवलं. यावरुन भाजप सरकार कोविड हाताळणी आणि व्यवस्थापनात पूर्णपणे अपयशी ठरल्याचं उघड झालं आहे. सरकारने जाणीवपूर्वक रुग्णांना कोविड मृत्यूच्या जबड्यात ढकललं. आरोग्यमंत्र्यांनी गोव्याचा ‘प्रयोगशाळा’ म्हणून वापर करताना गोंयकार रुग्णांना ‘गिनी पिग’ केलं, असा गंभीर आरोप पणजीकरांनी केलाय.

हेही वाचाः राज्यात लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर पर्यटन पुन्हा सुरू करावं

जाणीवपूर्वक मृतांची आकडेवारी लपवली

५ ऑगस्ट २०२० ते २२ मे २०२१ पर्यंतच्या कालावधीत कोविडने मरण पावलेल्या ६७ जणांची नोंदणी नऊ महिने होत नाही यावरुन या सरकारचा निर्लज्जपणा दिसतो, असा टोला काँग्रेस नेत्यांनी लगावलाय. भाजप सरकार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘अच्छे दिन’ची कृत्रीम भावना तयार करून ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत ‘आजाराचा बाजार’ करत जनतेला लुटलं आणि जाणीवपूर्वक संसर्ग झालेल्यांची आणि मृतांची आकडेवारी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचाः समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ‘त्या’ संशयिताला अटक

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना आयव्हरमेक्टिन गोळ्यांच्या खरेदीवर कमिशन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा कोविडसाठी वापर करणं बंद करण्याचे दिलेले निर्देश म्हणजे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंवर एक थप्पड असून, सुमारे २२ कोटी ५० लाख रुपयांच्या सदर गोळ्यांच्या खरेदीवर कमिशन खाण्यासाठीच मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी सदर गोळ्यांचं वाटप करण्याचा हट्ट धरला होता, हे आता उघड झाल्याचा दावा, पणजीकरांनी केला आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या तज्ज्ञ सल्लागारांवर कडक कारवाई करावी

सरकारला गोव्यातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा बंद करून सिंधदुर्गला ऑक्सिजन सिलिंडर पाठविण्यास सांगणारे, तज्ज्ञांचं म्हणणं न मानता आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्यास लावणारे, तसंच गृह विलगीकरण सामग्रीत नादुरूस्त ऑक्सिमीटरचा पुरवठा करण्याचा सल्ला देणाऱ्या विश्वजीत राणेंच्या सर्व तथाकथीत तज्ज्ञ सल्लागारांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही पणजीकरांनी केलीये.

हेही वाचाः पार्सेतील कांबळीवाड्यात नवीन नाल्याचे बांधकाम सुरू

भाजपच्या क्रूर कर्मांना कदापी माफी नाही

भ्रष्ट भाजप सरकारने शेकडो लोकांचे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बळी गेल्या नंतरही गोमेकॉत आक्सिजन प्रकल्प अजूनही कार्यांवित केला नाही हे धक्कादायक आहे. सरकारची असंवेदनशीलता यातून उघड होते. भाजपने आपल्या नाकर्तेपणाने निष्पापांचे बळी घेत हजारो संसार उध्वस्त केले आणि अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. भाजपच्या या क्रूर कर्मांना माफी कदापी मिळणार नाही, असं महिला काँग्रेस अध्यक्षा बिना नाईक यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाने सातत्याने केलेल्या मागणीनंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी झोपेतून जागे झाले आणि लसीकरणांवर त्यांनी घोषणा केली. प्रधानमंत्र्यांची सदर घोषणा म्हणजे परत एकदा जुमला ठरणार नाही अशी आशा आम्ही बाळगतो, असा टोलाही नाईक यांनी हाणला.

किती कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली?

सरकार कोविड लसींचा योग्य साठा मिळवू शकत नसताना, गोव्यातील खासगी हॉस्पिटलांना वेगवेगळ्या उत्पादकांच्या लसी कशा उपलब्ध होतात हे सरकारने जनतेला सांगावं, अशी मागणी युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकरांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकसान भरपाई म्हणून कोविड मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर केलेले प्रत्येकी रुपये ४ लाख तसंच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले रुपये २ लाख असे एकूण सहा लाख रुपये आजपर्यंत किती कुटुंबियांना वितरीत करण्यात आले याचा तपशील मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर ठेवावा. सरकारने त्वरित आणि कोणत्याही अटीविना सदर रक्कम मृतांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करावी, अशी मागणी ॲड. म्हार्दोळकरांनी केली.

गोंयकार शोक सागरात; सरकार उत्सव साजरे करण्यात

कोविड महामारीत काँग्रेस पक्षाने कोणतीच जाहिरातबाजी न करता लोकांची सेवा केली आणि गरजवंताना मदतीचा हात दिला. लोक संकटात असताना आणि हजारो कुटुंबिय शोक सागरात बुडालेले असताना भाजपचे सर्व मंत्री आणि पदाधिकारी केवळ उत्सव साजरे करून जाहिरातबाजी करण्यात व्यस्त राहिले, असं सेवा दल प्रमुख शंकर किर्लपारकर म्हणाले.

हेही वाचाः सुनील छेत्रीने मोडला लिओनेल मेस्सीचा रेकॉर्ड

गोंयकारांनी भाजपच्या गैरकारभाराची आठवण ठेवावी आणि आगामी विधानसभा निवडणूकीत त्यांना धडा शिकवावा, अशी विनंती सर्व काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!