सरकारने मराठी राजभाषा करण्याचा अध्यादेश काढावा

मराठी राजभाषा समितीचे ज्येष्ठ मराठी प्रेमी गो.रा.ढवळीकरांचं प्रतिपादन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः काश्मीरचे ३७० वे कलम रद्द करण्यासाठी देशात कुठेही आंदोलन झालं नाही, मोर्चे निघाले नाहीत, जनता रस्त्यावर आली नाही, किंवा कुणी हे कलम रद्द करावं म्हणून मागणी केली नाही. तरीही सरकारने अध्यादेश जारी करून कलम रद्द केलं. त्याच पद्धतीने आता सरकारने गोमंतकाची राजभाषा करण्यासाठी खास अध्यादेश काढून मराठीला राजमुकुट चढवावा, असं प्रतिपादन मराठी राजभाषा समितीचे ज्येष्ठ मराठी प्रेमी गो.रा.ढवळीकर यांनी क्रांतीदिनी पणजीतील आझाद मैदानावर केलं. मराठी प्रेमितर्फे क्रांतीदिनी सुरुवातीला हुतात्म्याना आदरांजली वाहिली आणि मराठीसाठी आता नव्याने क्रांती करण्याचा निर्धार केला.

हेही वाचाः गुजरातच्या साबरमती नदीतही आढळला कोरोना व्हायरस !

मराठी राजभाषा करण्यासाठी नव्याने प्रयत्न करणार

यावेळी पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, अनुराधा मोघे, यशवंत मळीक, मच्छिंद्र च्यारी, प्रतिभा बोरकर, राजाराम जोग, विनोद पोकळे, दिवाकर शिक्रे, निवृत्ती शिरोडकर, दत्ताराम ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. गोमंतकात परत एकदा नव्याने मराठी राजभाषा करण्यासाठी या पवित्रदिनी उपस्थितांनी निर्धार केला. गावागावात, वाड्यावाड्यावर मराठीची चळवळ नेण्यासाठी व्यापक बैठका घेऊन न्याय मिळेपर्यंत लढा देण्यावर एकमत झालं.

हेही वाचाः …अखेर लसीकरणातही घोटाळा ; चौघांना ठोकल्या बेड्या !

मराठी भाषा या मातीतली

मराठी ही या मातीतली, या भूमीतली भाषा आहे. ती परकी नाही. राजकर्त्यांनी मराठीचा वापर करून आपलं राजकीय स्थान मजबूत केलं. आता राजकर्त्यांनी आपली चूक मान्य करून सरकारी अध्यादेश काढून मराठी राजभाषा करून तिला राजमुकुट चढवला पाहिजे, अशी मागणी ढवळीकरांनी केली.

हेही वाचाः सरकारवर टीका करताना चांगल्या कामाची पावतीही द्यावी

मराठीला राजभाषेचा दर्जा द्यायला हवा

राज्यात एकूण १० मराठी वृतपत्रे चालतात. मराठी संस्कृती आजही अबाधित आहे. कीर्तन-भजन, सांस्कृतिक कार्यक्रम दरदिवशी गावागावातील मंदिरात, शाळांमध्ये होतात. आता सरकारने मराठीला उशिरा का होईना न्याय देण्यासाठी नवीन क्रांतीकारक निर्णय घेऊन, मराठीला राजभाषेचा दर्जा द्यायला हवा. असं केल्यास तीच खऱ्या अर्थाने स्वातंत्रसैनिक, हुतात्म्यांना वाहिलेली आदरांजली ठरेल, असं मत ढवळीकरांनी व्यक्त केलं. मराठीला न्याय मिळवून देण्यासाठी आता आम्हाला नव्याने क्रांती करावी लागेल, वेळप्रसंगी सरकारसोबत दोन हात करावे लागतील, असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचाः गोवा क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

मराठी आमचा श्वास आहे

मराठी हा आमचा श्वास आहे. तिला राजभाषेचा मान मिळायला हवा. त्यासाठी आम्ही परत जागृती करायला तयार आहोत. गावागावात परत बैठका, मराठी संस्कार केंद्रे उभारून मराठीची सेवा करूया, असं नाट्य कलाकार दत्ताराम ठाकूर बोलताना म्हणाले.

हेही वाचाः स्वतःचा स्वतःवर विश्वास असणं महत्त्वाचं

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा

भूतपूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची वेळोवेळी मराठी प्रेमींची भेट घेतली. त्या त्या वेळी मराठीवर झालेला अन्याय दूर करणार अशी आश्वासनं दिली. भाजपचे २१ आमदार विधानसभेत निवडून आले, तर मराठीला राज्यभाषेचा मुकुट चढवणार, असं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन आजपर्यंत पाळलेलं नाही. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन मराठीला मानाचं स्थान द्यावं. मराठीला राजभाषा करून कायमचा हा विषय सोडवावा, अशी मागणी यावेळी मराठी प्रेमींनी केली.

हेही वाचाः आणि नियतीनेही मागे वळून पाहिलं…

सुरुवातीला प्रतिभा बोरकर यांनी सूत्रसंचालन केलं. अनुराधा मोघेंनी आभार मानले. मच्छिंद्र च्यारी यांनी मराठीच्या चळवळीचा आढावा घेतला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!