तौक्ते चक्रीवादळाने केलेली नुकसान भरपाई सरकारने त्वरित द्यावी

धारगळ मोपा शेतकरी संघर्ष समितीचे निमंत्रक भारत बागकर यांची मागणी

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे तालुक्यातील चक्रीवादळाने केलेली नुकसान सरकारने त्वरित द्यावं, त्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी पेडणे तालुका नागरिक समितीचे तथा धारगळ मोपा शेतकरी संघर्ष समितीचे निमंत्रक भारत बागकर यांनी केलीये.

हेही वाचाः बुडालेल्या कुर्डी गावात कबर आली कुठून?

नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत

15 आणि 16 मे रोजी राज्यावर येऊन धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळात पेडणेकरांचं मोठ्या प्रमाणात  नुकसान झालंय. नुकसानग्रस्त नागरिक त्यांना नुकसान भरपाई आज मिळणार उद्या मिळणार या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्या दिशेने कोणतीच हालचाल होताना दिसत नसल्याने पेडणेकर नाराज बनलेत.

नुकसानाची यादी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सादर

दरम्यान चक्रीवादळ होऊन महिना होत आला. लगेच चार दिवसांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तुये हॉस्पिटल परिसरात आले होते. त्यावेळी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि तालुक्याचे उपजिल्हाधिकारी यांना अहवाल देण्याचे आदेश दिले होते. कृषी विभागाने शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याची यादी उपजिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली आहे. आता सरकारने नुकसान भरपाई लवकरात लवकर देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बागकरांनी केलीये.

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघातील सर्वसामान्यांना मिळणार मोफत सरकारी ऑनलाईन कागदपत्रे

तौक्ते चक्रीवादळाने केलं पेडणेकरांचं मोठं नुकसान

तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा पेडणे तालुक्याला बसलाय. वादळ येऊन गेल्यानंतर पाच दिवस या भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. वीज, पाणी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा 5 दिवस बंद पडली होती. या वादळाने पेडणेकरांनी कष्टातून उभी केलेली शेतकऱ्यांची शेती, बागायती, केळी, आंबे, काजू याची माती केली. प्राथमिक स्तरावर किमान ८० लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती पेडणे कृषी अधिकारी प्रसाद परब यांनी दिलीये.

2 वर्षांपूर्वी किमान 750 शेतकऱ्यांचं नुकसान

दोन वर्षांपूर्वी वादळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. किमान साडेसातशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. एकूण नुकसान अडीच कोटी रुपयांचं झालेलं. त्यातील अजून 90 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशी माहिती पेडणे कृषी विभागीय अधिकारी प्रसाद परब यांनी दिलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!