सरकारने ‘त्या’ दोन लाखांचा हिशोब द्यावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे यांची मागणी

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः कोरोना संसर्गामुळे दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना चार लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय. तर गोवा सरकारने मयताच्या कुटुंबियांना चार लाखांऐवजी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केलीये. मयतांच्या नावावरील पैसेदेखील सरकार हडप करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी केला आहे. त्या दोन लाखांचा हिशोब राज्य सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरलीये. म्हापसा येथे कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत अनिल केरकर, संजू तिवरेकर आणि सितेश मोरे उपस्थित होते.  

हेही वाचाः स्तनदा मातांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा द्या ; केंद्राची सुचना

भाजप सरकार घालतंय भ्रष्टाचाराला खतपाणी

भाजप सरकार करोनाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. ऑक्सिजन सिलेंडर घोटाळ्यानंतर आता मयत व्यक्तींची नुकसान भरपाईची रक्कम देखील सरकार हडप करतंय. मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारी सरकारची वृत्ती बनली आहे, असा आरोप बर्डेंनी केलाय.

हेही वाचाः स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी ‘या’ पंचायतीने दिले 20 हजार

महामारी हाताळण्यात सरकार असमर्थ

करोनाला वर्षं उलटलं आहे. सरकार ही महामारी हाताळण्यात असमर्थ ठरलं आहे. अपेक्षित उपाय योजना न केल्यामुळेच शैक्षणिक धोरण सरकारला ठरवता येत नाही. शैक्षणिक धोरण गांभीर्याने ठरवण्यासाठी सरकारने त्वरित पावसाळी अधिवेशन बोलवावं. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या चाळीस  लोकप्रतिनिधींना निवडून देण्यात आलंय. पण ते विधानसभेत जाण्यास घाबरत आहेत, अशी टीका बर्डेंनी केलीये.

हेही वाचाः मुरगाव तालुक्यातील गरजूंसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू

तरीही सरकार सुस्त

अजूनही दिवसाला 20 ते 25 लोकांचा मृत्यू होत आहे. सरकार मात्र अद्यापही गंभीर दिसत नाही. तौक्ते चक्रीवादळाने सरकारी यंत्रणेचा फज्जा उडवला. आता वैज्ञानिकांनी करोनाच्या तिसर्‍या कोविड लाटेचा इशारा दिलाय. तरीही सरकार सुस्त आहे. सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळखंडोबा होत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी मोबाईलचा वापर करतात.  मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे 4जी, 5जी मोबाईल रेडिएशनचा मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विधानसभा अधिवेशनात यावर तोडगा काढण्याची गरज आहे.

हेही वाचाः शिवोलीतील तरंगत्या जेटीचे चोपडेत स्थलांतर करणार

मंत्री लोबोंचं कौतुक

मृत्यूचा आकडा शून्यावर येईपर्यंत कर्फ्यू वाढवण्याची गरज आहे, असं विधान मंत्री मायकल लोबोंनी केलंय. शिवाय कळंगुट मतदारसंघात पंचायतींच्या सहाय्याने त्यांनी प्रथम स्वयंघोषित कर्फ्यू पुकारला होता. मंत्री लोबोंचं बर्डेंनी कौतुक करून या गोष्टींचे स्वागत केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!