21 खाजगी इस्पितळांच्या 50 टक्के खाटांचा ताबा महिनाभर सरकारकडे

महसूल सचिवांकडून आदेश जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील खाजगी इस्पितळांना 50 टक्के खाटा कोविड रूग्णांच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशांचे खाजगी इस्पितळे पालन करीत नाहीत,अशा तक्रारी सरकारकडे दाखल झाल्या आहेत. तसेच दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेच्या लाभार्थ्यांना कोविड उपचार नाकारणे आणि रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारण्याच्याही तक्रारींचा समावेश होता. या अनुषंगाने राज्य सरकारने एका महिन्यासाठी 21 खाजगी इस्पितळांतील 50 टक्के खाटांसाठी रूग्ण दाखल करून घेण्याचे अधिकार आपल्याकडे घेतलेत. महसूल सचिव संजय कुमार यांनी यासंबंधीचा आदेश रविवारी जारी केला.
आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 65 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला. देशातील कोविडची परिस्थिती पाहता हा संसर्ग आणखी पसरण्याचा धोका आहे आणि त्यातून आणखीन रूग्ण दाखल होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे या आदेशात म्हटलेय. प्रत्येक इस्पितळासाठी एक अधिकारी नेमण्यात येईल. कोविड रूग्णांसाठी राखीव असलेल्या खाटांवर रूग्ण दाखल करून घेण्याची प्रक्रिया हा संबंधीत अधिकारी करणार आहे. रूग्णांवरील उपचार, इस्पितळाचे व्यवस्थापन आणि इतर सेवा इस्पितळाच्यात असतील,असेही या आदेशात स्पष्ट केलंय. या इस्पितळात दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेच्या लाभार्थी असलेल्या कोविड रूग्णांना दाखल करून घेतले जाईल. सरकारच्या आरोग्य खात्याने निश्चित केलेल्या उपचार शुल्कांच्या अनुषंगाने खाजगी इस्पितळांचे पैसे सरकारकडून फेडले जातील असेही या आदेशात म्हटलेय.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास किंवा या आदेशाला असहकार्य केल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कलम 51 ते 60 अंतर्गत कारवाई केली जाईल,असा इशाराही देण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!