BOARD EXAMS | 12वीच्या परीक्षेबाबत सरकारकडे तीन पर्याय

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेली बोर्ड परीक्षांबाबतची बैठक नुकतीच पार पडली. राज्यातील 12वीच्या परीक्षांचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी म्हटलंय. याविषयी चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी 10 वा. मुख्यमंत्र्यांनी शालान्त मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.
हेही वाचाः BREAKING | बारावीची परीक्षा अखेर रद्द
काय ठरलं चर्चेत?
मंगळावारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कालच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीनंतर बुधवारी सकाळी 10 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी शालान्त मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यावेळी 12 वीच्या परीक्षेसाठी तीन पर्यायांची चाचपणी करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. तसंच या पर्यायांच्या आधारावर आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर केला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
LIVE : Press briefing of CM Dr Pramod Sawant https://t.co/x5kfflp6LR
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) June 2, 2021
तीन पर्याय कोणते?
अद्याप राज्यात गोवा बोर्डाच्या 12वीच्या परीक्षांबाबत काहीच निर्णय झालेला नाही. मात्र आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री याबाबत निर्णय घोषित करणार आहेत. 12वीच्या परीक्षांबाबतच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तीन पर्यायांची चाचपणी केली जाणार आहे. 12 वीची परीक्षा रद्द करणं, ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना पर्याय देऊन इतरांच्या गुणांचं मूल्यमापन करणं तसंच परीक्षा देणाऱ्यांचा आणि अंतर्गत मुल्यांकन होणार त्यांचा निकाल एकाच वेळी जाहीर करणे या तीन पर्यायांची चाचपणी करून काय तो निर्णय संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय.