शिवोलीतील तरंगत्या जेटीचे चोपडेत स्थलांतर करणार

कंत्राटदार मरिन टेक कंपनीचं शिवोली पंचायत मंडळाला आश्वासन

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: शिवोलीत पुलाखाली शापोरा नदीत तरंगती जेटी ठेवण्यात आली होती. येत्या पाच दिवसांत चोपडे येथे या जेटीचे स्थलांतर करण्याचं आश्वासन जेटीच्या कंत्राटदाराने पंचायत मंडळ तसंच ग्रामस्थांना दिलं आहे.

हेही वाचाः मुरगाव तालुक्यातील गरजूंसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू

जेटीमुळे मच्छिमारांना अडचण

शापोरा नदीत गेल्या काही दिवसांपूर्वी तरंगती जेटी आणून ठेवण्यात आली होती. या ठिकाणी गावातील मच्छिमार समाज मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. या तरंगत्या जेटीमुळे मच्छिमारांना अडचण निर्माण होत आहे, अशी तक्रार स्थानिकांनी मार्ना शिवोली पंचायतीकडे केली होती.

हेही वाचाः स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी ‘या’ पंचायतीने दिले 20 हजार

पंचायत मंडळाकडून बुधवारी जेटीची पहाणी

बुधवारी सकाळी या तक्रारीच्या आधारे पंचायत मंडळाने सदर जेटीची पाहणी केली. सरपंच शर्मिला वेर्णेकर, उपसरपंच फ्रेडी फर्नांडिस, पंच सदस्य फेर्मीना फर्नांडिस, विघ्नेश चोडणकर, मोनाली पेडणेकर तसंच ग्रामस्थ निलेश वेर्णेकर, यदुवीर सीमेपुरूषकर, प्रेमानंद आरोलकर, अमित मोरजकर तसंच इतर यावेळी उपस्थित होते. शिवाय कंत्राटदार मरिन टेक कंपनीचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

हेही वाचाः स्तनदा मातांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा द्या ; केंद्राची सुचना

काम पूर्ण झाल्यानंतर जेटीचं चोपडेत स्थलांतर

पाहाणीवेळी पंचायत मंडळाने कंत्राटदार कंपनीच्या अधिकार्‍यांना जेटीबाबत स्पष्टीकरण देण्याची सूचना केली. कंपनीचे अधिकारी कॉस्मे डिसिल्वा म्हणाले, बंदर कप्तान खात्यातर्फे गोव्यात एकूण चार जेटी उभारण्याचं कंत्राट मिळालं आहे. यातील एका जेटीचं उद्घाटन गोवा घटक राज्य दिनी झालं आहे. मच्छिमारांना किंवा इतरांना वापरण्यासाठी या जेटी उभारण्यात येत आहेत. सध्या ही जेटी शिवोलीच्या बाजूने शापोरा नदीत ठेवण्यात आली आहे. जेटीचं काम अजून चालू असून ते भरती ओहोटीवर अवलंबून असेल. काम पूर्ण झाल्यानंतर जेटी चोपडेत स्थलांतरीत केली जाईल, असं आश्वासन डिसिल्वा यांनी दिलं.

हेही वाचाः बलात्कार प्रकरणातील तेजपालला हायकोर्टाची नोटीस

तर स्थानिकांचा विरोध नसेल

कंपनीने शक्य तितक्या लवकर जेटीचं स्थलांतर करावं, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जर लोकांच्या हितासाठी जेटी असेल तर स्थानिकांचा त्यास विरोध नसेल. पण याबाबत सरकारने लोकांना विश्वासात घ्यायला हवं, अशी मागणी निलेश वेर्णेकर यांनी केली.  

हेही वाचाः ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज’ अंतर्गत 48 तासांत दाव्याची रक्कम मिळणार

स्थानिकांच्या जेटीला विरोध

मुरगाव पोर्ट ट्रस्टकडून 13 मे रोजी जेटी संदर्भात पंचायतीकडे एक पत्र आलं होतं. या पत्रात जेटीबद्दल कोणत्याही प्रकारची सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर जेटी नदीमध्ये आणून ठेवण्यात आली. जेटी निदर्शनास येताच लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. स्थानिकांकडून होणार्‍या विरोधाची दखल घेऊन मंगळवारी झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत जेटीला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरपंच शर्मिला वेर्णेकर यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!