‘डेल्टा प्लस’चा महाराष्ट्रातला पहिला बळी रत्नागिरीत

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध पुन्हा केले कडक ; गोव्यातही घोषणेची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : उत्परिवर्तित डेल्टा प्लस विषाणूने रत्नागिरी जिल्ह्यात एका ८० वर्षीय महिलेचा १२ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले. डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूच्या संसर्गाचा हा महाराष्ट्र राज्यातील पहिला बळी आहे.  साथरोगतज्ज्ञ या उत्परिवर्तित विषाणूचा उल्लेख ‘डेल्टा प्लस’ असा करत असले तरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अधिकृत तपशिलात त्याचा उल्लेख ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ असा करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये असे ९ रुग्ण सापडले आहेत. चौकशीनंतर संगमेश्वर तालुक्यातील एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित ८ जणांची प्रकृती स्थिर आहे.

डेल्टा प्लस विषाणूनं सध्या सर्वांचीच झोप उडवलीय. महाराष्ट्रात तर पुन्हा निर्बंध कडक करण्यात येत आहेत. दरम्यान, गोवा राज्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे. गोव्याला लागुन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातच एक रूग्ण आढळला आहे. त्यातच गोव्याला लागुनच असलेल्या कर्नाटक राज्यातही या विषाणूचे दोन रूग्ण सापडले आहेत. यासंदर्भात गोवा सरकारनं खास दक्षता घेतली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आता या विषाणूचा प्रसार वाढल्यामुळं पुन्हा निर्बंध कडक करण्यात येत आहेत. त्याचबरोबर गोवा राज्यातही दक्षतेच्या पातळीवर सध्याच्या निर्बंधांचा कालावधी वाढवला जावू शकतो. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यासंदर्भात येत्या काही कालावधीत घोषणा करण्याची शक्यत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!