अयोध्येला ३ डिसेंबरला पहिली ट्रेन : केजरीवाल

दिल्ली सरकारची तीर्थयात्रा योजना

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: दिल्ली सरकारच्या तीर्थयात्रा योजनेअंतर्गत ३ डिसेंबर रोजी अयोध्येला पहिली ट्रेन रवाना होणार आहे. इच्छुक पात्र रहिवासी ई-जिल्हा पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करू शकतात. गरज पडल्यास सरकार आणखी गाड्या सुरू करेल. वेलंकणी चर्चचाही लवकरच तीर्थक्षेत्रांच्या यादीत समावेश केला जाणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

योजनेअंतर्गत पूर्वी १२ मार्ग हाेते

केजरीवाल पुढे म्हणाले, या योजनेअंतर्गत पूर्वी १२ मार्ग हाेते. पुरी, द्वारका, हरिद्वार, ऋषिकेश, रामेश्वरम, शिर्डी आणि अजमेर शरीफ या धार्मिक स्थळांचा समावेश होता. आता अयोध्येचाही समावेश झाला आहे. या योजनेचा ३६ हजारांहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. अयोध्या ट्रेनसाठी नोंदणी सुरू आहे. संख्या वाढल्यास आणखी एक ट्रेनही उपलब्ध केली जाईल. ख्रिश्चन बांधवांच्या मागणीनुसार लवकरच तीर्थक्षेत्रांच्या यादीत वेलंकणी चर्चचा समावेश केला जाईल.

योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सरकारी मदत

‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना’ दिल्लीतील रहिवाशांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सरकारी मदत पुरवते. दिल्ली सरकार आयआरसीटीसीमार्फत टूर्सची सुविधा देते. भक्तांना एसी ट्रेन आणि एसी हॉटेल रूम ऑफर करते. प्रवास, खानपान, निवास यांचा संपूर्ण खर्च सरकार करते. भाविकांना १ लाख रुपयांचे विमा संरक्षणही असते. ६० किंवा त्याहून अधिक वयाचा नागरिक आमदाराकडून प्रमाणपत्र घेऊन योजनेचा लाभ घेऊ शकतो. २१ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा एक साहाय्यक प्रत्येक प्रवासी सोबत घेऊ शकतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लोकांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. उमेदवारांची निवड सोडतीद्वारे केली जाते.

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दरबारात घालवलेला वेळ मला दिव्यता आणि मनःशांती देऊन गेला. येथून बाहेर पडताना माझ्या मनात एकच विचार होता, मला देशातील प्रत्येकाला तुमच्या दरबारात आणण्यासाठी शक्ती द्या, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!