मयेतील प्रसिद्ध कळसोत्सवाला सुरुवात

पोलिस बंदोबस्तात उत्सव; २६ रोजी सांगता

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः किरकोळ अपवाद वगळता समस्त भाविकांचं लक्ष लागून राहिलेल्या मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला गुरुवारी ठरलेल्या दिवशी भाविकभक्तांच्या साक्षीत उत्साहात प्रारंभ झाला. घरोघरी कलश फिरवल्यानंतर २६ मार्चला कलशाचं गावकरवाडा येथील श्री महामाया मंदिरात आगमन झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणारेय.

पोलिस बंदोबस्तात कळसोत्सवाला सुरुवात

डिचोलीचे मामलेदार तसंच देवालयाचे प्रशासक प्रवीणजय पंडित यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे गुरुवारी या कळसोत्सवाला सुरुवात झाली. यापूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा कळसोत्सव निर्विघ्नपणे प्रारंभ होणार की नाही त्याबाबत काहीशी साशंकता होती. तरीदेखील देवस्थान समिती आणि महाजनांनी कळसोत्सव साजरा करण्याची तयारी केली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, त्याची दक्षता घेत मंदिरातून देवीचा कळस बाहेर काढताना मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गटाने काहीसा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण….

गुरुवारी संध्याकाळी श्री महामाया मंदिरात देवीचा कलश फुलांच्या गजऱ्यांनी सजविण्यात आला. नंतर मामलेदारांच्या आदेशाप्रमाणे कलश सभामंडपात आणून गाड कुटुंबियांतील मोडाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. गाऱ्हाणे घातल्यानंतर अवसारी मोडासहीत वाजतगाजत देवीच्या कलशाचं श्री केळबाय मंदिराकडे प्रस्थान झालं. केळबाय मंदिरात पूजाअर्चा आदी पारंपरिक धार्मिक विधी पार पाडण्यात आले. संध्याकाळी उशिरा कलशाचं श्री सातेरी मंदिरात प्रस्थान झालं. दरम्यान, केळबाय मंदिरात नेताना दुसऱ्या गटाने काहीसा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडक पोलिस बंदोबस्तामुळे कोणताही तणाव न होता, परिस्थिती नियंत्रणात आली. मामलेदारांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मामलेदार माजिक आणि पोलिस अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.

मयेतीला कळसोत्सव वादात

मागील काही वर्षांपासून मान व अधिकाराच्या मुद्यावरुन मयेतीला कळसोत्सव वादात अडकलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून २०१९ साली मयेतील कळसोत्सव आणि नंतर माल्याची जत्रा आदी प्रमुख उत्सव निलंबीत करण्यात आले होते. मागील वर्षीही काळसोत्सवावरुन वाद निर्माण झाला होता. देवस्थान समितीच्या सहकार्यातून कळसोत्सव साजरा करावा, असा आदेश देवालयाचे प्रशासक तथा डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिला होता. नंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून ऐन काळसोत्सवाच्या दिवशी म्हणजेच मागील वर्षी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळसोत्सव निलंबीत करण्याचा आदेश दिला. त्यामुळे ठरलेल्या दिवशी कळासोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. मागाहून गेल्या वर्षी ३ मार्च रोजी कळसोत्सव साजरा करण्याबाबतीत उच्च न्यायालयाने परव समाजाला मोकळीक दिल्याने कळसोत्सव साजरा करण्याबाबतीत हालाचाली सुरू झाल्या. श्री माया केळबाय देवस्थानशी संलग्न देवस्थानच्या चौगुले मालकांशी चर्चा केल्यानंतर ७ मार्च रोजी एकाच दिवसात कळासोत्सव साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला. त्याप्रमाणे पोलिस बंदोबस्तात एकाच दिवसात कळसोत्सव साजरा केला होता. देवस्थान समितीच्या मागणीनुसार मागीलवर्षी कळसोत्सवावेळी सशस्त्र पोलिसांसह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!