पळा पळा, कोण पुढे पळे तो…

राज्यात निवडणूकीचं बिगुल वाजलं; सत्ताशर्यत सुरू झाली

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पणजीः राज्यात निवडणूकीचं बिगुल वाजलं आहे. सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल.संतोष यांचा गोवा दौरा झाल्यानंतर भाजप आमदारांनी जनसंपर्काचा धडाकाच लावला आहे. गेली साडेचार वर्षं भाजपच्या सत्तेला धोका पोहोचू नये म्हणून तडजोड करून गप्प राहीलेले नेते आता पुन्हा आपल्या राजकीय कारकीर्दीला संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी जागे झालेत. यात जुने आणि नवे असा नवा वाद भाजपात सुरू झाला आहे. एकूणच उमेदवारी वाटपाचं एक मोठं संकट भाजपसमोर उभं राहणार आहे हे या परिस्थितीवरून स्पष्ट होतं. यातून भाजप कशी वाट काढतं यावरूनच त्यांचं भवितव्य ठरणार आहे. पण गोष्ट मात्र खरी की, पळा पळा कोण पुढे पळे तो अशी अवस्था सगळ्याच राजकीय पक्षांची बनली असून ही सत्ताशर्यत सुरू झाली आहे हे नक्की.

हेही वाचाः CRIME | जन्मठेपेची शिक्षा रद्द; 10 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा

सध्याच्या परिस्थितीत भाजपविरोधात प्रचंड नाराजी आहे. या गोष्टीबाबत कुणाचंही दुमत असू शकत नाही. परंतु ही नाराजी विस्कळीत आहे. या नाराजीला योग्य दिशा प्राप्त करून देऊन त्याचं भाजपविरोधी मतदानात रूपांतर करू शकणार असा एकही विरोधी पक्ष नाही. साहजिकच या विस्कळीत नाराजीचे विभाजन होईल आणि भाजप पुन्हा एकदा सत्तेवर चिकटून राहील, अशी शक्यता अधिक आहे. या सगळ्या गोष्टी विरोधकांनाही माहीत आहेत. परंतु दुर्दैवाने विरोधकांत असा एकही नेता नाही किंवा एकही प्रभावी शक्ती नाही, जी त्यांना एकत्रित आणू शकेल. या सगळ्या गोष्टींचा अगदी बारकाईने भाजपने अभ्यास केला आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा सत्तेवर येणार अशी खात्री भाजपची झाली आहे. विरोधी पक्षांचे नाजूक दुवेही भाजपने ओळखले आहेत. जेणेकरून ते कायम विस्कळीतच राहतील याचेही छुपे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. एवढं सगळं कमी म्हणून की काय, पण आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपचे आमदार कितीही निवडून आले, तरी सत्ता ही भाजपचीच असणार, असा जोरदार प्रचार भाजपकडून सुरू आहे. या प्रचाराचा परिणाम म्हणून विरोधकांबाबत लोकांच्या मनात अविश्वास आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. या लोकांना निवडून आणलं, तर हे लोक पुन्हा सत्तेसाठी भाजपला साथ देणार नाहीत याची हमी कोण देणार, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. या परिस्थितीचा लाभ नकळतपणे आणि छुप्या रितीने आम आदमी पार्टी उठवत आहे. या पार्टीचे उमेदवार बंडखोरी करणार नाहीत असं लोकांना वाटत आहे. रिव्होल्यूशनरी गोवन्स संघटनेकडेही काही प्रमाणात लोक आकर्षित होऊ लागलेत. भाजपला धडा शिकवण्याची किंवा पर्याय हेच ठरू शकतात, असा विचार करणारा एक घटकही तयार होतो आहे. या सगळ्याचा परिणाम नेमका राजकारणावर काय पडणार आहे हे येणाऱ्या काळात आणखीन स्पष्ट होणार आहे.

हेही वाचाः निवृत्त खलाशांसाठी गोवा सरकारची नवी पेन्शन योजना

गोवा विधानसभेत फक्त 13 जागा जिंकूनही भाजपने आजतागायत आपली सत्ता एनकेन प्रकारे कायम ठेवली. सर्वांत मोठा पक्ष म्हणून जनतेने 17 जागा जिंकून दिलेल्या काँग्रेसकडे फक्त 5 आमदार राहीले आहेत. ते देखील देहाने काँग्रेसचे पण मनाने भाजपचे बनल्याची लोकांची भावना बनली आहे. विधीमंडळाची ही गत आणि प्रदेश काँग्रेसचा सेनापती कोण हा प्रश्न गत निवडणूकीनंतरपासून प्रलंबित आहे. भाजपने विरोधकांची घाऊक खरेदी सुरू केल्यामुळे पक्षश्रेष्ठीनाही धास्ती लागली आहे. पक्षनिष्ठेबाबत तडजोड करणे उपयोगाचे नाही. कुणी कितीही बढाया मारल्या तरी नीट विचारांतीच त्यांना काँग्रेसची धुरा विश्वासू नेत्याकडेच द्यावी लागेल. हा नेता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी कितपत उपयोगी पडेल हा प्रश्न आहेच. परंतु तो विषय निष्ठेपुढे गौण ठरू शकतो,अशी श्रेष्ठींची परिस्थिती बनली आहे.

हेही वाचाः भाजप-काँग्रेसची राजकीय टोलेबाजी

मगो पक्षाबाबत बोलायचं झालं तर सुदिन ढवळीकर हे राष्ट्रीय पक्षांसोबत युती करणार नाही, असं सांगत आहेत. तिकडे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष दीपक ढवळीकर हे मात्र युतीचा प्रस्ताव आल्यानंतर विचार करू, असं म्हणून युतीसाठीचे दरवाजे खुले ठेवत आहेत. सुदिन ढवळीकरांना बंधुप्रेमापोटी आपल्या मंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं. बऱ्याच काळानंतर ते सत्तेबाहेर आहेत आणि त्याचे चटके त्यांना आता बसू लागलेत. आगामी विधानसभा ही आपली शेवटची असल्याचं ते म्हणतात. ते ज्येष्ठ नेते आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी मगो पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता, तर निश्चितच ही संधी त्यांना मिळू शकली असती. परंतु तसा निर्णय घेण्याचं धाडस त्यांनी केलं नाही, याचं श्रेय त्यांना द्यावंच लागेल. आता मात्र ते वेगळी व्युहरचना आखत आहेत. मगो पक्षाने स्वबळावर किमान 5 ते 7 जागा जिंकल्यास मुख्यमंत्रीपद चालून येईल, असं त्यांना वाटतं. दीपक ढवळीकर हे मात्र प्रॅक्टीकल विचार करत आहेत. भाजपला रोखायचं असेल, तर विरोधकांनी सगळे मतभेद विसरून एकत्र येणं हा एकमेव पर्याय अन्यथा भाजपला सत्तेवरून खाली खेचणं केवळ अशक्य हे ते चांगलं ओळखून आहे. आता मगो पक्ष नेमका कोणता मार्ग चोखाळतो हे पाहावं लागेल.

हेही वाचाः बार्देशचे उपजिल्हाधिकारी कपिल फडते यांची अचानक बदली

गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई हे आपल्यापरिने बरेच प्रयत्न करत आहेत. गिरीश चोडणकर आणि विजय सरदेसाई यांच्यात एकमेकांबाबत जो दूरावा निर्माण झाला आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या सोयरीकेत अडचणी येत आहेत. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती होऊ नये यासाठी भाजपचेही प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या संधीची वाट पाहत आहे. भाजपसहीत सर्व प्रमुख पक्षांकडून उमेदवारी नाकारण्यात येणाऱ्यांना पक्षाची उमेदवारी भेट देऊन त्यांच्या तापलेल्या तव्यावर आपली भाकरी भाजण्याची योजना त्यांनी तयार केली आहे. भाजपातील बंडखोरांना काँग्रेसने दरवाजे बंद केले आहेत. यापैकी विजयाची खात्री असलेल्यांना आपल्याकडे आणून आपले विधानसभेतील अस्तित्व कायम ठेवण्याची त्यांची रणनिती आहे.

हेही वाचाः हणजूण पार्टीप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश

या सगळ्यात गोंयचो आवाज संघटनेने राजकीय पक्षासाठी नोंदणी चालवली आहे. रिव्होल्यूशनरी गोवन्स संघटनेनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही संघटना प्रमुख राजकीय पक्षांना कितपत रोखू शकतील हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. आम आदमी पार्टी धुर्तपणे आपले डाव खेळत आहे. त्यांच्याकडे कुणीही गंभीरपणे पाहत नसले तरी शेवटच्या घटकेला सगळ्याच राजकीय पक्षांना धक्का देण्याचं तंत्र त्यांनी अवलंबलं आहे. प्रत्यक्षात त्यांचं काम दिसत नसलं तरी प्रत्येक मतदारसंघात त्यांचं छुपं काम सुरू आहे आणि योग्य वेळी आपले पत्ते उघड करण्याचं धक्कातंत्र ते अवलंबणार आहेत. या एकंदरत राजकीय स्पर्धेत कोण बाजी मारतो ते पाहायला थोडी कळ सोसावी लागेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!