कोविडचा घरातल्या कमावत्या माणसांवरच आघात!

देशात गेल्या वर्षभरात कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींचा आकडा थक्क करणारा आहे.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः गेल्या वर्षी कोविड हळूच देशात घुसला काय, अन् हा हा म्हणता सर्वत्र त्यानं आपली भीती प्रस्थापित केली काय. या कोविडनं सगळ्यांचं आयुष्य नोकोसं करून टाकलं. राज्यातही सुरुवातीला कोविडने शिरकाव केल्याचं समजल्यावर सगळ्यांचाच गोंधळ उडालेला. पण हळुहळू आता साधारण वर्षभरानंतर स्थिती पूर्वपदावर येतेय. गेल्या वर्षभरात कोविडमुळे राज्यात असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. या कोविडने बरीच उलथापालथ केलीये.

मृत व्यक्तींमध्ये १५० हून अधिक व्यक्ती कमावत्या

देशात गेल्या वर्षभरात कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींचा आकडा थक्क करणारा आहे. आपल्या राज्यातच कोविडमुळे आतापर्यंत एकूण ७४४ रुग्णांचा मृत्यू झालाय. यापैकी दीडशेहून अधिक व्यक्ती कमावत्या वयोगटातील असल्याचं समोर आलंय. कोविडनं देशात थैमान घातलेला असला, तरी नोकरदार वर्गाला कामावर जाणं क्रमप्राप्त होतं. सर्वतोपरी काळजी घेऊनही कोविडनं गाठलेल्या या लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत.

३० ते ६० वयोगटातील सर्वाधिक बळी

कोविडच्या कचाट्यात सापडलेले व्यक्ती हे ३० ते ६० या वयोगटातील जास्त असल्याचं समोर आलंय. या वयोगटातील दीडशेहून अधिक व्यक्तींचा कोविडने बळी घेतलाय. १७ सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत ज्या कोविड रुग्णांचे बळी गेलेत, त्यात सुमारे १३७ व्यक्ती अशा आहेत, ज्यांचा वयोगट ६० किंवा त्याहून कमी आहे. डिसेंबर महिन्यात जे एकूण बळी गेलेत, त्यातही पंचवीस ते साठ अशा वयोगटातील अनेक रुग्ण आहेत . तुलनेने डिसेंबरमध्ये बळी कमी गेलेत.

सप्टेंबरने घेतले जास्त बळी

ऑगस्ट महिन्यात एकूण १४९ कोविड रुग्णांचा जीव गेला. त्यापैकी अनेक जण साठ वर्षांहून जास्त वयाचे होते तर काही जण ६० वर्षांहून कमी वयाचे. सप्टेंबर महिना हा जास्त बळी घेणारा ठरला. या महिन्यात गोव्यातील सर्वांत मोठ्या गणेश चतुर्थी सणानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींना कोविडने गाठलं. आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी लोकांनी थोडीसुद्धा कमतरता ठेवली नाही. बाजारपेठांमधील गर्दी, आणि यामुळे वेगाने झालेला कोविडचा फैलाव या महिन्यात मृत्य व्यक्तींच्या आकड्यात झालेल्या वाढीसाठी कारणीभूत ठरलंय. त्या एका महिन्यात राज्यात कोविडमुळे २३५ व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्यातही पुन्हा साठ वर्षांहून कमी वयाचे अनेक जण आहेत. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कोविडशी निगडित बळींचं प्रमाण ५८ टक्क्यांनी वाढलंय.

तीन दिवसांत मृत्यू नाही

नवं वर्षं सुरू झालंय तसंच कोविड रुग्णांचं प्रमाण थोडं कमी होत असल्याचं दिसून येतंय. जानेवारी महिन्यात कोविड बळींचं प्रमाण कमी झालंय. गेल्या ७२ तासांत तर शून्यबळांची नोंद झालीये. सलग तीन दिवस कोविडमुळे राज्यात एकाचाही मृत्यू झालेला नाहीये. शुक्रवारी नवे ८३ कोविड रुग्ण आढळलेत. एकूण २०८७ कोविड चाचण्या चोवीस तासात करण्यात आल्यात. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ हजार ७०९ व्यक्तींना कोविडची लागण झालीये. त्यापैकी ५० हजार ८८ व्यक्ती ठीक झाल्यात.

या कोविड नावाच्या राक्षसाची जर लढायचंय, तर त्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायला हवी. लवकरच कोविडवरील लस सर्वांना मिळेल. पण म्हणून सगळं ठीक होईल का? नाही… पुढेही आपण आपली काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता पाळणं महत्त्वाचं. मित्रांनो, आयुष्य मूल्यवान असंत, अन् ते एकदाच मिळतं. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!