दोडामार्ग पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; दारूसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

संदिप देसाई | प्रतिनिधी
दोडामार्ग : सिंधुदुर्ग पोलिसांनी चोरट्या दारू विक्रीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत आज दोडामार्ग पोलिसांना मोठं घबाड हाती लागले आहे. एक एनपी ट्रक भरलेली सुमारे २० लाखाची गोवा दारू पोलिसांनी या धडक मोहिमेत हस्तगत केली आहे. एनपी ट्रकसह तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हाती लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी विकत केला आहे.
गोवा-दोडामार्ग तपासणी नाक्यावरून पुढे जात असताना रात्री ८.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक आर. जी. नदाफ, सहाय्यक पो. नि. महेंद्र घाक, कुलदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
माल वाहतूक करणार्या एनपीट्रक मध्ये मागे गव्हाचा भुसा भरलेल्या पोत्यांआड ही लाखोंची दारू पद्धतशीरपणे लपली गेली होती. सिंधुदुर्ग पोलिसांनी चोरट्या दारू विक्रीच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली असताना आज सायंकाळी ८.३० च्या दरम्यान एमएच १२ ईक्यू १२७९ या क्रमांकाचा एनपी ट्रक गोवा हद्दीवरील दोडामार्ग तपासणी नाक्यावर दाखल झाला. तपासणी नाक्यावर तपासणी करताना बिलटी नकली असल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि तिथेच खाकीने आपला अस्सल इंगा दाखवत माल वाहतुकीच्या नावाखाली वाहतूक केल्या जाणार्या गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचा पर्दाफाश झाला.
मागे सुरवातीला भुसा सदृश्य भरलेल्या पिशव्या पण आत संपूर्ण गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचे बॉक्स खच्चाखच भरलेले होते. हे संपूर्ण घबाड एनपी ट्रक व ट्रकचा चालक व वाहक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपक न्यानू कडेकर वय ३४, राहणार चाकण पुणे व राहुल संपत कदम वय ३४, मोहोळ पुणे यांना ताब्यात घेतले आहे. दोघे पुण्याचे राहणार असल्याने व एनपी ट्रक सुद्धा पुणे पासिंग असल्याने या लाखोंच्या दारूचे पुणे कनेक्शन अधोरेखित होत आहे. मात्र उशीर झाल्याने टी ट्रक भरून पकडलेली दारू ताब्यात घेण्यासाठी व पुढील कारवाई करण्यासाठी पोलिस कार्यरत होते.
दोडामार्ग पोलिस ठाण्याच्या इतिहासात एवढी मोठी चोरटी दारू पकडण्याची ही पहिलीच धडक कारवाई आहे. यात पोलिस निरीक्षक आर. जी. नदाफ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाक, कुलदीप पाटील, अनिल पाटील, सुभाष गवस, सुरजसिंग ठाकुर, संजय गवस, चालक दीपक सुतार, महिला पोलिस चैताली भांडलकर, रेजिंठा डिसोझा, भक्ती शिरवलकर आदींचा सहभाग होता.