विद्यमान सरकार राज्यासाठी पातकी

मगो नेते सुदिन ढवळीकरांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः जनतेच्या कौलाचा अनादर करून आणि भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेची पायमल्ली करून राज्यात स्थापन केलेले भाजप सरकार पातकी ठरल्याचा आरोप मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी केला. खाण उद्योगाचा नायनाट, पर्यटनाची घसरण, राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल, नागरीकांच्या आरोग्याची दैना, बारीक घटकांना उद्धस्त करण्याचा डाव आदींमुळे राज्यात कुणालाच सुख आणि समाधान नाही,असंही ते म्हणाले. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यात स्वार्थी राजकारणाने परमोच्च पातळी गाठली आणि धर्म आणि भक्तीचाही बाजार मांडला,अशीही टीका त्यांनी केली.
गेल्या काही वर्षांपासून आपल्या राज्याची प्रचंड दैना सुरू असल्याचं मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितलं. इथे कुणीही नागरीक कुठल्याच बाबतीत स्थिरस्थावर होऊ शकत नसल्याचे चित्र पसरले आहे. सगळीकडेच अस्थिरता आणि प्रत्येकाच्या आयुष्यात इतके चढउतार यायला लागलेत की राज्याचं सामाजिक जीवनच अशांत बनलंय, असे निरीक्षण सुदिन ढवळीकर यांनी केलंय. आपण इतकी वर्षे राजकारणात आहे परंतु इतका कठिण आणि बिकट काळ कधीच पाहीला नव्हता,असे ते म्हणाले. आपण गोंयकार सुशेगाद आणि समाधानी अशी आपली ओळख होती. आज या दोन्ही गोष्टी गोंयकारांच्या आयुष्यातुन हरवल्याहेत. गोंयकारांचा सुशेग गायब झालाय,असं ते म्हणाले. सरकारची चुकीची आर्थिक, सामाजिक धोरणे याला कारणीभूत असल्याचं ते म्हणाले. वास्तविक विद्यमान सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नव्हे तर जनतेच्या कौलाचा अनादर करून केवळ सत्तेच्या जोरावर जनतेचा कौल हिसकावून मिळवलेली ही सत्ता आहे,अशी टीका त्यांनी केली. राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठं पक्षांतर भाजपनं घडवून आणलं. पैशांच्या जोरावर काहीही करता येतं,अशी मानसिकता या सरकारात दृढ बनलीए.

धर्म आणि भक्तीचा मांडलाय बाजार
आपला गोवा ही एक पवित्र भूमी आहे. इथे पावलोपावली देवाचं अस्तित्व आहे. अलिकडच्या काळात राजकारणाने इथल्या मंदिरांचं आणि इथल्या भक्तीचं पावित्र्यच प्रदूषित केलंय. एनकेन प्रकरणांवरून मंदिरांत जाऊन देवांना साकडे घालायचे आणि नंतर नेमके त्याच्या उलट वागायचे ही पद्धतच राहीलीए. या पद्धतीचे गंभीर परिणाम अनेकांना भोगावे लागल्याचे पाहायला मिळते,असा टोलाही ढवळीकरांनी लगावला. निवडणूकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना मंदिरात भेट द्यायची. तिथे यश मिळावे असं साकडं घालायचं. नंतर निवडून आल्यानंतर पुन्हा मंदिरात आशिर्वादासाठी जायचं आणि मग पक्षांतर केल्यानंतर पुन्हा मंदिरात जायचं. हे करत असताना आमदार, मंत्र्यांसोबत त्यांचे कार्यकर्तेही असतात. ते देखील आपल्या नेत्यांसाठी देवाकडे सांगणे करतात. हेच नेते जेव्हा उलटतात तेव्हा कार्यकर्त्यांनी देवाकडे केलेल्या सांगण्याचं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर कधीच सापडलेलं नाही. पक्षांतर करून आणि जनतेच्या कौलाचा अनादर करून हे नेते आपले कार्यकर्ते आणि मतदारांची जशी फसवणूक करतात त्याचप्रमाणे हे नेते देवदेवतांचीही प्रतारणा करीत असतात. सध्याची राज्यावरील एकामागोमाग एक संकटांची जंत्री बघितली की आपल्या सगळ्यांवरच देव कोपल्याचे दिसून येते. आपण जोपर्यंत या केलेल्या पापांचे प्रायश्चित करत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती अशीच सुरू राहील. गोवा, गोंयकार आणि या पवित्र भूमीवरील देवता यांचे पावित्र्य जपण्याची गरज आहे. हे पावित्र्य भंग झाले की ही अशी संकटे येत राहतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!