CURFEW | कर्फ्यूचा कालावधी आणखी वाढणार

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: राज्यात कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर 9 मे पासून राज्यव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आलाय. दर सात दिवसांच्या अंतराने आत्तापर्यंत या राज्यव्यापी कर्फ्यूचा कालावधी वाढवण्यात आलाय. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडून कर्फ्यूमध्ये वाढ करणार असल्याचे संकेत देण्यात आलेत. त्यामुळे राज्यव्यापी कर्फ्यू अजून काही दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट
राज्यात कोविडबाधित होण्याचा दर स्थिर
राज्याचा कोविडबाधित होण्याचा दर तसंच दररोजच्या मृतांची संख्या अजूनही स्थिर आहे. त्यामुळे राज्यव्यापी कर्फ्यू १२ जुलैनंतरही वाढू शकतो, असे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिले. दरम्यान, शुक्रवारी आणखी दोन मृत आणि २२० नव्या बाधितांची नोंद झाली.
हेही वाचाः JOB ALERT | रतन टाटांची कंपनी टीसीएस 40 हजार फ्रेशर्स घेणार
दररोज सरासरी दोन ते चार मृत्यू
करोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेला राज्यव्यापी कर्फ्यू १२ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने काहीच दिवसांपूर्वी घेतला. त्याचवेळी बार आणि रेस्टॉरन्ट रात्री ९ वाजेपर्यंत आणि सर्वच प्रकारची दुकाने, सलून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून कर्फ्यू कायम आहे. तरीही बाधित होण्याचा दर तीन ते चार टक्क्यांच्या दरम्यान आहे. दररोज सरासरी तीन ते चार जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कर्फ्यू आणखी काही दिवस ठेवण्याची गरज आहे. नागरिक, व्यापाऱ्यांना आणखी शिथिलता देऊन कर्फ्यू आणखी वाढवण्याचा विचार होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचाः ZIKA VIRUS: झिका व्हायरसचा धोका; ‘या’ राज्यात सापडले १४ रुग्ण
सक्रिय बाधितांची संख्या १ हजार ९९५
दरम्यान, सावंतवाडी येथील ३५ आणि मडगाव येथील ८४ वर्षीय दोन महिलांचा करोनामुळे मृत्यू झाला. या नव्या दोन मृतांमुळे एकूण कोविडबळींची संख्या ३ हजार ८८ झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवारच्या चोवीस तासांत आरोग्य खात्याला ४ हजार ५१७ अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील २२० जण बाधित सापडले. त्यामुळे बाधित होण्याचा दर वाढून पुन्हा ४.८ टक्के झाला. याच कालावधीत १८८ जणांनी करोनावर मात केली. पण बरे होण्याचा दर घटून ९६.९८ टक्के झाला. आणखी १७ जणांना कोविड हॉस्पिटलातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या १ हजार ९९५ झाली आहे.
हेही वाचाः गुळे येथे एकाच जागी दोन म्हालवाहू ट्रक कलंडले
निर्बंध शिथिल केल्यानंतर बाधितांत वाढ
राज्यव्यापी कर्फ्यूचा कालावधी १२ जुलैपर्यंत वाढवताना सरकारने निर्बंध शिथिल केले. त्यानंतर बहुतांशी जनता रस्त्यावर आल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून बाधितांची संख्या वाढत असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांचा विचार करून सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. याचा गांभीर्याने विचार करून जनतेने करोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.