हवालदार बनले देवदूत

वास्को रेल्वेस्थानकावरील थरार; कृष्णा पाटील यांनी रेल्वे प्रवाशाला मृत्यूच्या दाढेतून वाचवले

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को: येथील रेल्वे स्थानकावर धावती पॅसेजर ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात हात निसटून फलाट व रेल्वेच्या मध्ये फरफटत जाणाऱ्या एका प्रवाशाला रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे हवालदार कृष्णा. एम. पाटील यांनी प्रसंगावधान राखून ओढून फलाटावर आणले. त्यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला. पाटील यांच्या या धाडसाबद्दल रेल्वे मंत्री पीयुष गोयल व अधिकारी वर्गाने त्यांचे कौतुक केलं आहे.

हेही वाचाः ‘आजादी का अमृत महोत्सव’चा साबरमतीत उद्या शुभारंभ

वास्को रेल्वेस्थानकावरील थरार

ही घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. हवालदार कृष्णा एम. पाटील हे बुधवारी सायंकाळी वास्को रेल्वे स्थानकाहून सुटणाऱ्या पाटणा रेल्वे पॅसेंजर गाडीमध्ये कामाचा एक भाग म्हणून तपासणी करीत होते. या दरम्यान गाडी स्थानकातून हळूहळू निघाल्यावर फलाटावरील काही प्रवाशांनी धावत पळत जाऊन ट्रेन पकडली. या दरम्यान पाटील हे डब्यातून फलाटावर हळूवारपणे उतरले. ते पुढे जात असतानाच त्यांना एक प्रवासी फरफटत निघाल्याचे दिसले. धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा हात सुटला व तो फलाट व रेल्वे गाडीच्या पायऱ्यामध्ये फरफटत चालला होता. ही घटना पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. पाटील यांनी क्षणाचाही वेळ न दवडता त्वरित वेगाने धाव घेऊन त्या युवकाच्या बखोटीला धरून खेचून फलाटावर घेतले. तेथून त्याला रेल्वेपासून दूर नेले. पाटील यांनी त्या प्रवाशाला खेचले नसते तर रेल्वेखाली पडून त्याचा जीव गेला असता.

गार्डला सांगून रेल्वे गाडी काही क्षणासाठी थांबवली

हवालदार कृष्णा. एम. पाटील यांनी त्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढले. तो प्रवासी आपल्या चार मुलांसह गावी चालला होता. त्यामुळे चार मुले त्या रेल्वे डब्यामध्ये असल्याचे तो ओरडून सांगू लागला. पाटील यांनी गार्डला सांगून रेल्वे गाडी काही क्षणासाठी थांबवल्यावर तो प्रवासी त्या रेल्वेमध्ये चढून मार्गस्थ झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!