2 हजार लोकप्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः अंथरुणावर खिळून असलेल्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी 15 दिवसांनी फिरती लसीकरण मोहिम राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी केली. येत्या 10 दिवसांत 45 वयोगटावरील सर्वांना लस देण्याचं लक्ष्यही मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्यांसमोर ठेवलं असल्याचं राज्याच्या भाजप माध्यम विभागाचे समन्वयक संदेश साधले म्हणाले.

लोकप्रतिनिधींना केलं मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहित
राज्यभरातील दोन हजार पंच, नगरसेवक आणि जिल्हा पंचायत सदस्यांशी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. प्रत्येक लोकप्रतिनिधीने दर दिवशी 10 जणांना लसीकरणासाठी न्यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं. मंगळवारपासून अजून 37 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली, असल्याचंही साधले म्हणाले.
हेही वाचाः Video | CM VC MEETING | BREAKING | २ हजार लोकप्रतिनिधींना थेट निर्देश, कामाला लागा!
कोविड मृतांवर गावांतील स्मशानभूमीतच अंत्यंस्कार करावेत
गावांतील स्मशानभूमीत कोविड रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास द्यावेत आणि त्यासाठी लागणारी पीपीई कीट आरोग्याधिकारी देतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार त्यांना 45 वय वर्षं झाली नसतानाही लस घेता यावी यासाठी त्यांना कोविड योद्धा म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या बैठकीत पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो सहभागी झाले, असल्याची माहिती साधलेंनी दिली.