एक मोदी आणि अर्धे अमित शहा…केवळ दीड माणसं चालवताहेत केंद्र सरकार !

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर महाराष्ट्र काँग्रसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्ताराबरोबर फेरबदल करण्यात आले. मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर काही जणांना बढती देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. “मंत्रिमंडळ विस्तार हा विषय निरर्थक यासाठी आहे की, मुखवटे कितीही बदलले व अवडंबर केले तरी सत्य कसे लपणार? सत्य हेच आहे की हे सरकार केवळ दीड माणसं चालवत आहेत. एक मोदी आणि अर्धे अमित शाह!,” अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर महाराष्ट्र काँग्रसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. “मोदींचा मंत्रीमंडळ विस्तार-आपल्या अभूतपूर्व अपयशाचे खापर फोडण्यासाठी काही अजून डोकी सामिल करत आहेत. डळमळीत अर्थव्यवस्था,आकाशाला भिडणारी महागाई, अपमानित होत असलेल्या महिला, बेरोजगारीने लाचार तरुण, आक्रोश करणारे शेतकरी, सीमेवर संकट झेलणारे सैनिक, दहशतवादाचे काश्मीरमध्ये वाढते संकट करोनाची तिसरी लाट आणि भयानक हाहाकाराचे सावट असे अनेक मुद्दे देशासमोर आहेत. असे असताना मंत्रिमंडळ विस्तार हा विषय निरर्थक यासाठी आहे की मुखवटे कितीही बदलले व अवडंबर केले तरी सत्य कसे लपणार? सत्य हेच आहे की हे सरकार केवळ दीड माणसं चालवत आहेत. एक मोदी आणि अर्धे अमित शाह!,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.

“बाकी केवळ संगीत खुर्ची! या मंत्र्यांना नाहीतरी ट्रोलिंगशिवाय अधिक काम असणार नाही. त्यामुळे एक खुर्ची आणि अर्ध्या स्टूलवर बसलेल्या मोदी व शाहांना आम्ही प्रश्न विचारत राहू. त्यांना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलायला, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरूद्ध लढण्याचं नियोजन करण्यास वेळ नाही. सर्वपक्षीय बैठक बोलावयाला वेळ नाही. पण दलबदलू व सत्तेसाठी हपापलेल्यांसाठी मंत्रिमंडळ विस्ताराचा खेळ अशा संकटकाळी मांडायला वेळ आहे, हे स्पष्ट दिसून येते. हाच मोदी सरकारचा खरा चेहरा आहे. मोदी सरकारच्या सत्तेच्या खेळाशी जीवनमरणाचा संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाचे कोणतेही घेणं देणं नाही,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!