हरवळे धबधब्यावर बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचं शव सापडलं

विनायक सामंत | प्रतिनिधी
साखळीः येथील हरवळे धबधब्यावर सोमवारी संध्याकाळी ६ वाजता पुन्हा एकदा परप्रांतीय युवकाचा बळी गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी खूप शोधल्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजता युवकाचं शव हाती लागलं. गेल्या १५ – २० दिवसांतील ही दुसरी घटना आहे. या आधीदेखील कितीतरीच पर्यटकांचा या धबधब्यात बुडून जीव गेला आहे.
हेही वाचाः अमर्याद पर्यटन म्हणजे काय ते स्पष्ट करा
तोल गेल्याने पाण्यात पडला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील शिव विहार, उत्तम नगर येथील २१ वर्षीय हर्ष राजेश कुमार हा १२ उत्तीर्ण विद्यार्थी आपल्या इतर ३ मित्रांसोबत सहलीच्या निमित्ताने २१ ऑगस्ट रोजी गोव्यात आला होता. सोमवारी दुपारी हे ४ जण हरवळे धबधब्यावर आंघोळीसाठी उतरले असता हर्षचा तोल गेल्यानं तो अचानक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्याचादेखील वेळ मिळाला नाही. नंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तातडीने पाचरण करून ७.३० वाजता त्याचं शव बाहेर काढण्यात आलं.
पर्यटक आपली मनमानी करतात
हरवळेच्या रुदेश्वर देवस्थानचे समितीचे सदस्य संगेश कुंडईकर म्हणाले, भाविक रूद्रेश्वराच्या दर्शनासाठी येतात, धबधबा पहाण्यासाठी येतात ही चांगलीच गोष्ट आहे. परंतू काही पर्यटक सेक्युरिटीने सांगितल असूनदेखील त्यांना न जुमानता पाण्यात उतरून मस्ती करतात आणि आपला जीव गमवून बसतात. अशावेळी कोणीच काही करू शकत नाही.
हेही वाचाः काँग्रेस पक्षाने वाहिली आयरीन बार्रोस यांना श्रद्धांजली
वारंवार विनंती करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष
देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी सांगितलं की प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनसुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. आम्ही परत परत सांगून थकलो. जर प्रशासनाला जमत नसेल, तर देवस्थान समिती इथली सर्व जबाबदारी उचलायला सक्षम आहे.
हेही वाचाः जातीनिहाय जनगणनेची मागणी आणि वास्तव…
याशिवाय पर्यटन खात्यामार्फत १९ कोटींचा सौंदर्यीकरण प्रकल्प हरवळे धबधब्याला मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे.