फुटीरतेला प्रोत्साहन देणं, घोडबाजार करण्याचं भाजप सरकारचं धोरण उघड

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांची टीका; भ्रष्ट भाजपला येत्या निवडणूकीत धडा शिकवण्याचं गोंयकारांना आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा विधानसभेच्या आगामी सत्रात पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक करुन पक्षांतरास कायमचा पूर्णविराम द्यावा अशी मागणी करणारं विधेयक मी दाखल केलं होतं. घटनेच्या दहाव्या परिशिष्टात आवश्यक बदल करण्यास केंद्र सरकारकडे मागणी करणारं सदर विधेयक शुक्रवारी विधीमंडळ सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत नसल्यानं सदर विधेयक साध दाखल करुन घेण्याचं सौजन्य या सरकारने दाखवलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजप सरकार पक्षांतर आणि घोडेबाजाराला प्रोत्साहन देत असल्याचंच या कृतीतून स्पष्ट झाल्याचं विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः वास्को अमर नाईक खून प्रकरण: अमर नाईक यांच्यावर आज अंत्यसंस्कार

भाजपकडून आडकाठी आणण्याचा प्रयत्न

गोव्यातील सर्व आमदारांनी माझ्या विधेयकास एकमताने पाठिंबा द्यावा आणि माजी मंत्री तथा घटना तज्ज्ञ स्व. काशिनाथ जल्मी यांची पक्षांतरं कायमची बंद करण्याची आकांशापूर्ती करावी असं आवाहन मी केलं होतं. सन १९९० मध्ये त्यांनी दिलेला ऐतिहासीक निवाडा सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला होता, याची आठवण दिगंबर कामतांनी करुन दिली आहे. आज पक्षांतराच्या विरूद्ध क्रांतिकारी पाऊल उचलण्याची वेळ आलेली असताना भाजप मात्र त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप कामतांनी केलाय.

पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक आणि प्रभावी करणं गरजेचं

घटनेच्या दहाव्या परिशिष्टात आवश्यक बदल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणारे विधेयक अडवून ठेवण्याच्या भाजप सरकारच्या कृतीचा मी निषेध करतो. आज संसदेत भाजपकडे बहुमत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक आणि प्रभावी करणं गरजेचं आहे आणि भाजपने त्यावर त्वरित कृती करावी, अशी मागणी कामतांनी केली आहे.

हेही वाचाः सीईटी परीक्षेसाठी जीत आरोलकरांकडून विद्यार्थ्यांना ऑफर

भ्रष्ट भाजपला येत्या निवडणूकीत धडा शिकवूया

भाजपने देशात फोडाफोडीचं आणि पक्षांतराचं राजकारण करुन मणिपूर, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश येथे गैरमार्गाने सरकार स्थापन केलं. महाराष्ट्र आणि राजस्थानातही त्यांनी असाच अयशस्वी प्रयोग केला. गोंयकारांनी या भ्रष्ट भाजपला येत्या निवडणूकीत धडा शिकवावा, असं आवाहन कामतांनी केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!