लाडली लक्ष्मीच्या लाभधारकांच्या भावनांशी भाजप सरकारचा खेळ

महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील अकार्यक्षम आणि असंवेदनशील भाजप सरकारने आता तांत्रिकदृष्ट्या अवैध झालेली पत्रे पाठवून लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभधारकांच्या भावनांशी खेळ मांडला आहे. सरकारने लोकांना मुर्ख बनवणं थांबवून त्वरित सर्व लाभधारकांची माफी मागावी, अशी मागणी महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी केली आहे.

हेही वाचाः सावधान! क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे हे ‘8’ धोके

मार्चची तारीख असलेल्या पत्रांना आता तीन महिने झाले

महिला आणि बाल कल्याण खात्यातर्फे गोव्यातील अनेक लाडली लक्ष्मी लाभधारकांना पाठवलेल्या मंजुरी पत्रावर २६ मार्च २०२१ आणि १८ जून २०२१ अशा तारखा आहेत. सर्व लाभधारकांनी दहा दिवसांच्या आत महिला व बाल कल्याण खात्याकडे दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधुन सर्व सोपस्कार पूर्ण करण्याचं सदर पत्रात नमुद करण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मार्चची तारीख असलेल्या पत्रांना आता तीन महिने झाले आहेत, याकडे बिना नाईक यांनी लक्ष वेधलंय.

हेही वाचाः कैद्यांसाठी ‘गोवा कारागृह नियम 2021’

लोकांना फसवण्याचा सरकारचा कुटील डाव उघड

लोक कल्याणासाठी आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी अवैध पत्रे पाठवण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे. प्रत्यक्षात मात्र सर्व मंजुरी पत्रे अवैध ठरवून लोकांना फसवण्याचा सरकारचा कुटील डाव उघड होत आहे. सदर पत्रातच दहा दिवसात सर्व सोपस्कार पूर्ण न केल्यास लाडली लक्ष्मीचा अर्ज बाद होणार असल्याचं स्पष्टपणे लिहीलं आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! आठ राज्यपाल बदलले

विलंब का झाला यावर स्पष्टीकरण द्या

भाजप सरकारने मार्च आणि जूनची पत्रे त्यावेळीच का पाठवली नाहीत हे सांगावं. लाभधारकांना मंजुरी पत्रे पाठवण्यासाठी ३ महिने ते १५ दिवस असा विलंब का झाला यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, असं बिना नाईक यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः “आमचो आर्लेकर बाब हिमाचलचो राज्यपाल झालो !”

सरकारचा सारवासारव करण्याचा प्रयत्न

आगामी विधानसभा निवडणूकीत आपला दारुण पराभव समोर दिसत असल्यानंच भाजप सरकार गोंधळलं आहे. दोन ते तीन वर्षांमागील अर्जांची मंजुरी पत्रे आता पाठवुन सरकार सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका बिना नाईक यांनी केली.

हेही वाचाः BREAKING | पी.एस.श्रीधरन पिल्लई गोव्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त

अर्ज कधी मंजुर होतील याची तारीख स्पष्ट करा

भाजप सरकारने ताबडतोब नवीन आदेश जारी करावा आणि सदर पत्रांची वैधता वाढवावी तसंच सर्व लाभधारकांना आपले सोपस्कार पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ द्यावा. सरकारने आतापर्यंत किती अर्ज मंजुर झालेले नाहीत त्याची आकडेवारी जाहीर करावी आणि सदर अर्ज कधी मंजुर होतील याची तारीख स्पष्ट करावी, अशी मागणी बिना नाईक यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!