भाजप सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात ‘इंटेसिवीस्ट’ नसल्याची धक्कादायक माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी उघड केल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट, असंवेदनशील आणि बेजबाबदार भाजप सरकारने शेकडो निष्पाप रुग्णांचे बळी गेल्यानंतरही लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच ठेवल्याचं स्पष्ट झालंय, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी केलाय.

हेही वाचाः अखेर चिकन मार्केटजवळील ‘तो’ कचरा नगरपालिकेने हटवला

म्हणून कॉम्प्रेसर अजूनही गोमेकॉत पोचलेला नाही

ऑक्सिजनचा पुरवठा बंद करून कोविड रुग्णांचे बळी घेणाऱ्या भाजप सरकारने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंमधे कमिशनच्या वाटणीवरुन नवा वाद तयार झाल्याने अजूनही गोमेकॉतील ऑक्सिजन प्रकल्प कार्यांवित केलेला नाही. सदर प्लांटसाठी लागणारा कॉम्प्रेसर विकत घेताना सदर पुरवठादाराकडून किक-बॅकच्या रकमेची वाटणी करण्यात मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये एकवाकत्या होत नसल्यानं सदर कॉम्प्रेसर अजूनही गोमेकॉत पोचलेला नाही, असं चोडणकरांनी म्हटलंय.

हेही वाचाः ‘आप’कडून राज्यात २४० ऑक्सिजन तपासणी केंद्रांची सुरुवात

मंत्र्यांमधील भ्रष्टाचाराने आज शासन काळवंडलंय

मुख्यमंत्र्यानी २५ एप्रिल रोजी सदर ऑक्सिजन प्रकल्प १५ मे २०२१ पर्यंत कार्यांवित करणार असल्याचं जाहीर केलं होतं. भाजप सरकारच्या मंत्र्यांमधील भ्रष्टाचाराने आज शासन काळवंडलेलं आहे. भाजपचे पदाधिकारीही मलीदा लाटण्यात व्यस्त असून, आजाराचा बाजार करून लुटमार करत आहेत. भाजप सरकारच्या गैर प्राथमिकतांमुळे आज शेकडो लोकांचे बळी गेलेत, असा दावा गिरीश चोडणकरांनी केलाय.

हेही वाचाः गोवा शिक्षण मंडळाने काढलेल्या परिपत्रकात क्रीडा सवलतीच्या गुणांचा उल्लेख नाही

लोकांच्या आरोग्यासाठी इंटेसिव्हीस्ट नेमणं सरकारला परवडत नाही

कोविड महामारीचं संकट समोर असताना, तसंच तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असताना, भाजप सरकार अतिदक्षता विभागाची देखरेख ठेवण्यासाठी सदर डॉक्टरचा पगार परवडत नाही म्हणून ‘इंटेसिव्हीस्ट’ची नेमणूक करत नाही. भाजप सरकारकडे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांचं स्मृतीस्थळ बांधण्यासाठी १० ते १५ कोटी आहेत. पण लोकांच्या आरोग्यासाठी एक इंटेसिव्हीस्ट नेमणं सरकारला परवडत नाही. यावरून या सरकारचा बेजबाबदारपणा दिसतो. गोमेकॉत तसंच इतर सरकारी हॉस्पिटलात आज डॉक्टर आणि  इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. परंतु प्रत्येक सरकारी नोकरी विकणारं भाजप सरकार लाच मिळत नसल्यानंच सदर पदांवर योग्य तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करत नाही.

हेही वाचाः करोनावरील उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन, डॉक्सिसाईक्लिन औषधांचा वापर थांबवा

म्हणून आरोग्यमंत्र्यांची वाचा बंद पडली

कोविड आजारावर खबरदारीचा उपाय म्हणून इव्हर्मेक्टिन गोळ्यांचा वापर, होम आयसोलेशन किटमधील नादुरूस्त, ऑक्सिमीटर आणि कमी औषधं यावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे गप्प आहेत. काँग्रेस पक्षाने यात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचं उघड केल्यानेच आरोग्यमंत्र्यांची वाचा बंद पडली आहे, असा दावा चोडणकरांनी केलाय.

हेही वाचाः या ‘5’ गोष्टींवर बोलू शकतात मोदी

हिम्मत असेल तर समितीचा अहवाल सादर करा

गोमेकॉतील ऑक्सिजन पुरवठा आणि दगावलेले रुग्ण यांची चौकशी करण्यासाठी सरकारने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. सदर समितीचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिम्मत असेल तर जाहीर करावा, असं उघड आव्हान चोडणकरांनी दिलंय.

हेही वाचाः कासारवर्णे कालवा फुटून रस्त्यावर पाणीच पाणी

लोकांच्या जीवाशी खेळणं बंद करा

सरकारने लोकांच्या जीवाशी आणि भावनांशी खेळणं बंद करावं. आता केवळ आरोग्य सुविधा भक्कम करण्यावर सरकारने खर्च करावा आणि इतर सर्व वायफळ खर्च बंद करावेत, अशी मागणी चोडणकरांनी केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!