गोव्यात सर्वोत्कृष्ठ ठरला कासारवर्णे-पेडणे सार्वजनिक मंडळाचा देखावा

कला-संस्कृती खात्याच्या स्पर्धेत मिळालं पहिलं बक्षीस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : पेडणे ही गोमंतकातील कलाकारांची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथे अनेक कलावंत घडून गेले आणि घडत आहेत. संगीत, नाटक, चित्रकला, हस्तकला इत्यादी अनेक कला कलाकारांनी सातत्याने जोपासल्या आहेत. पेडण्यात गणेश चतुर्थीची सजावट करणारे अनेक कलावंत आणि अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत. असेच एक गणेशोत्सव मंडळ ज्याने आत्ताच गगनभरारी मारलेली आहे ते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कासारवर्णे. कला आणि संस्कृती विभागाच्या गणेश देखावा स्पर्धेत या मंडळांनं गोव्यात पहिला नंबर पटकावलाय.

गोव्यातील सरकारचे कला आणि संस्कृती खाते गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी सजावट स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेला गोव्यातून भरपूर प्रतिसाद मिळतो. यंदाही त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. नुकताच या स्पर्धेचा निकाल लागला. या स्पर्धेत पेडण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कासारवर्णे यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

पत्रकारांशी बोलताना या मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गाड म्हणाले की, जवळजवळ ८० ते ९० कार्यकर्ते एकत्र येऊन या सजावटीचे काम करतात. मागील एक महिनाभर हा उपक्रम नियमितपणे चालतो. स्वबळावर उभी केलेली ही सजावट आज गावाचे नाव उज्ज्वल करत आहे. गोवा सरकारचे सजावटीचे पारितोषिक प्राप्त झाल्याचा आम्हाला आनंद आहे. गणपती बाप्पाने हे फळ आमच्या पदरात घातले आहे. सगळे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेऊन ही भव्य सजावट उभी करतात. आम्हाला मंडळातील कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे.

या गणेशोत्सव मंडळाने गेल्यावर्षी गावातील बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू केली. एवढेच नव्हे तर मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी प्रवास खर्च सुद्धा हाती घेतला आहे. पेडण्यातील या गणेशोत्सव मंडळाने पेडणे तालुक्याचे नाव उंचीवर आणले आहे. यांच्या कार्यास सलाम देऊन पारितोषिक मिळाल्याबद्दल मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी मंडळाचे अभिनंदन केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!