मच्छिमार देशोधडीला : ‘तौक्ते’च्या तडाख्यानं बोटी फुटल्या, वाहून गेल्या !

नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी भरपाई द्यावी ; मच्छीमारांची मागणी !

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : अरबी समुद्रातून गुजरातकडे प्रयाण करताना मुंबईसह कोकण किनारपट्टीला तडाखा देणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबई, ठाणे, पालघर किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायाचे मोठे नुकसान झाले आहे. किनाऱ्यावर बांधून ठेवलेल्या शेकडो बोटी वादळाच्या तडाख्याने फुटून उद्ध्वस्त झाल्या असून अनेक बोटींना जलसमाधी मिळाली. मच्छीमारांचे झालेले नुकसान आणि कोळीवाड्यातील हानीची पाहणी करून सरकारने मदत करावी, अशी मागणी या समुदायाकडून होत आहे.

‘या’ किनाऱ्यावर झालं शेकडो बोटींचं नुकसान !
वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी त्यांच्या नौका रविवारीच किनाऱ्यावर आणून ठेवल्या होत्या. नांगर टाकून त्या वाहून जाणार नाहीत, अशा पद्धतीने त्या बांधण्यात आल्या होता, परंतु वाऱ्याचा वेग आणि खवळलेला समुद्र यामुळे बोटी एकमेकांना आदळल्या. कुलाबा, माहीम, खार दांडा, ट्रॉम्बे, उत्तन, पालघर येथील किनाऱ्यांवर शेकडो बोटींचे नुकसान झाल्याची माहिती मच्छीमारांनी दिली. माहीम किनारपट्टीत दोन मच्छीमार नौका उद्ध्वस्त झाल्या असून या नौकेतील एक मच्छीमार अद्याप बेपत्ता आहे. दोन मच्छीमारांना प्रशासनाने सुखरूप किनाऱ्यावर आणले आहे.

.. इतक्या बोटी फुटल्या !
खारदांडा येथेही काही नौका वाहून गेल्या. त्यात दोन मच्छीमार बेपत्ता झाले. कुलाबा, ससून डॉक येथे ५२ बोटी, तर ट्रॉम्बे येथे जवळपास ४० बोटी फुटल्या. वांद्रे-वरळी सी लिंकच्या नजीक एक मच्छीमार नौका अडकलेली होती. मंगळवारी दुपारी ती बाहेर काढण्यात आली. तर खार दांडा, माहीम, वरळी बंदरावर १२ ते १४ बोटी फुटल्या. वादळच्या पूर्वसूचनेमुळे चार दिवसांपासून मच्छीमारांनी बोटी समुद्रात उतरवल्या नाहीत, तर गेलेल्या बोटीही दोन दिवस आधीच किनाऱ्यावर आल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!