आम आदमी पक्ष सपशेल नापास ; दिल्ली करवाढीच्या चक्रात !

भारतीय जनता महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानती श्रीनिवासन यांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविड काळामध्ये दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने जनतेला वाऱ्यावर‌‌ सोडले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि जनतेला महामारीच्या तडाख्यातून वाचवले. आपच्या दिल्ली सरकारने हे मोफत, ते मोफत म्हणत नागरीकांना करवाढीच्या जाळ्यात अडकवले, अशी टीका भारतीय जनता महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानती श्रीनिवासन यांनी आज येथे केली. भारतीय जनता महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

या बैठकीची सुरुवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनसचिव सतीश धोंड, भारतीय जनता महिला मोर्चाच्या राज्य प्रभारी सुलक्षणा सावंत, प्रदेशाध्यक्ष डॉ. शीतल नाईक आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

श्रीनिवासन म्हणाल्या, गोव्यातही आप जे काही मागाल ते मोफत देण्याच्या घोषणा करत आहे. येथे त्यांचे सरकार येणार नसल्याने ते सोने मोफत वाटण्याची घोषणाही करू शकतात. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोचवले पाहिजे. कोविड काळात गोवा सरकारने मोफत उपचार देतानाच सर्व सुविधा उभारल्या. कोविड काळामध्ये सेवा ही संघटन या ब्रिदानुसार महिला कार्यकर्त्यांनी जनसेवा केली आहे. कार्यकर्त्यांनी आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपासाठी आज काय काम केले याची दररोज उजळणी करतानाच उद्या काय करणार याचेही नियोजन केले पाहिजे. राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मंत्री, मुख्यमंत्री अशी पदे महिलांना देणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे ते लक्षात घेऊन सर्वांनी काम करावे, असेही त्या म्हणाल्या.

भारतीय जनता महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस सुखप्रित कौर म्हणाल्या, कुटुंबातील महिलेने भाजपाला मतदान करायचे ठरवले की ते कुटुंब भाजपालाच मतदान करेल. म्हणूनच कुटुंब, कुटुंबापर्यंत पोहचण्याचे काम भारतीय जनता महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. भाजपाच महिला सक्षमीकरण, महिलांचा नेतृत्व विकास आदींवर भर देतो. भाजपामध्येच सर्वसामान्य कार्यकर्ता पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार बनू शकतो. कॉंग्रेस पश्चिम बंगाल, बिहारमध्ये संपली आहे, गोव्यातही उरली सुरली कॉंग्रेस या निवडणुकीत संपणार आहे. हे करण्यात भारतीय जनता महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठा वाटा उचलावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!