आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ट्वीट करत काँग्रेसवर हल्लाबोल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशातल्या आणीबाणीच्या दिवसाला आज ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात २१ महिने आपत्कालीन परिस्थितीची अंमलबजावणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत काँग्रेवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही भावनांना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करुया.”

इंस्टाग्रामवरील एक लिंक शेअर करत पंतप्रधानांनी लिहिले, ”काँग्रेसने आपल्या लोकशाही आचारांना चिरडले. आणीबाणीला विरोध दर्शविणारे आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करणारे सर्व महान लोक यावेळी आम्हाला आठवतात.”

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, १९७५ च्या या दिवशी कॉंग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती.

ते म्हणाले, “असंख्य सत्याग्रह्यांना तुरूंगात टाकण्यात आले आणि प्रेस देखील बंद केले गेले. नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊन संसद आणि कोर्टाला निःशब्द प्रेक्षक बनविले. एका कुटुंबाच्या विरोधात उठणारा आवाज शांत करण्यासाठी लावण्यात आलेली आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा एक गडद अध्याय आहे. २१ महिने निर्दय शासनाचे क्रौर अत्याचार सहन करत देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्व देशवासियांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम.”

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!