गोवा-सिंधुदुर्गात कामासाठी येणा-जाणाऱ्यांना टेस्ट बंधनकारकच !

रॅपीड टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर : सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे

Goan Varta Live | प्रतिनिधी

सावंतवाडी : गोव्यात कामानिमित्त जा ये करणाऱ्या व्यक्तींना रॅपिड टेस्ट केली जाईल. मात्र रॅपिड निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर टेस्ट ही बंधनकारक असणार असून या टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट सात दिवसासाठी वैध राहील, असं तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्याच्या काढलेल्या आदेशानुसार गोवा हद्दीलगत असलेल्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या व्यक्तींसमोर मोठी समस्या निर्माण झाली. आज सकाळी गोव्यात कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तींची आरोंदा व सातार्डा चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिस चेक पोस्टवर जिल्ह्यातून गोव्यात व गोवा राज्यातून जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला जात असल्याने जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला गोव्यात न सोडण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याने पोलिसानी गोव्यात जाणार्‍या व्यक्तींना चेक पोस्टवरच रोखले.

यासंदर्भात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी संपर्क साधून गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य तो पर्याय काढावा, अशी विनंती केली. त्यावर आज गोव्यात जाणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. मात्र गोव्यातून जिल्ह्यात प्रवेश करत असताना सर्व व्यक्तींची रॅपिड टेस्ट केली जाईल. ज्या व्यक्तींची रॅपिड टेस्ट पॉझिटिव येईल त्यांना तात्काळ विलगीकरणात दाखल केले जाईल. तर ज्या व्यक्तींची रॅपिड टेस्ट निगेटिव्ह येईल, त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्याचा रिपोर्ट सात दिवसासाठी वैध राहील. मात्र सात दिवसानंतर पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करून निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या व्यक्तींना गोव्यातून जा-ये करण्याची मुभा राहील अशी माहिती तहसीलदार म्हात्रे यांनी दिली. हा निर्णय सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे व सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद यांनी एकत्रितपणे घेतला असल्याचेही तहसिलदार म्हात्रे यांनी सांगितले. या निर्णयामुळे गोव्यात जा ये करणाऱ्या व्यक्तींना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक राहणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!