कोविड लक्षणे दिसताच तत्काळ चाचणी करा !

मुख्यमंत्री : स्वत:हून नियम पाळण्याचेही आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात कोविड, इन्फ्लुएंझाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. कोविड लक्षणे दिसताच तत्काळ चाचणी करून घेऊन विलगीकरणात रहावे. याबाबत केंद्राकडून येणार्‍या मार्गदर्शक तत्त्वांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कोविड, इन्फ्लुएंझाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य खात्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी करीत जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या होत्या. याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, केवळ गोव्यातच नव्हे, तर देशभरात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. सोबतच इन्फ्लुएंझाच्या रुग्णांतही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लक्षणे आढळताच तत्काळ जवळच्या इस्पितळांत जाऊन चाचणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन त्यांनी केले. कोविड तसेच इन्फ्लुएंझाबाबत केंद्र सरकारकडून जारी होणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचीच राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नवे २४ रुग्ण; चाचण्यांत वाढ

कोविड रुग्ण वाढत असल्याने अलर्ट झालेल्या आरोग्य खात्याने कोविड चाचण्या वाढवण्यावर भर दिलेला आहे. गेल्या चोवीस तासांत ४७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २४ जण बाधित ठरले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १२५ झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!