तेरेखोल नदीचं पात्र रुंदावलं; माडांना जलसमाधी

बेकायदा रेती व्यवसायाचा बागायतीला फटका; सरकारी यंत्रणा ठरतेय कुचकामी

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः २०१२ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपचे नेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि पर्यायाने पेडणे तालुक्यात परिवर्तन यात्रा काढली होती. त्यावेळी तेरेखोल आणि शापोरा नदीत बेकायदा रेतीव्यवसाय करणाऱ्यांना परवाने देण्याची घोषणा पर्रीकरांनी केली होती. या व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांनी 2012 साली भाजपला पूर्ण पाठिंबा देऊन भाजपचं सरकार बहुमतांनी निवडून आणलं. भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर या व्यावसायिकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र २०१७ च्या निवडणुका जवळ येताच कडक नियम तसंच अटी घालून परवाने करण्यात आले. काही जणांनी परवाने घेतले, काहीजणांनी परवाने न घेताच बेकायदा रेती उपसा करण्याचं काम सुरू केलं.

कुठल्याही कृतीला मर्यादा असते

रेती व्यवसायाला कुणाचा विरोध नाही. परंतू कुठल्याही कृतीला मर्यादा असते. रेती व्यावसायिकांनी मर्यादांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात दोन्ही नद्यांमधून अमर्याद रेती उपसा केला आहे. त्याचे परिणाम भर पावसाळ्यात दिसून येत आहेत. पेडणे तालुक्यातील दोन्ही शापोरा आणि तेरेखोल नदीकिनारी फेरफटका मारला तर आपल्या लक्षात येईल. दोन्ही नद्यांची पात्र रुंदावत चाललीत. सभोवतालच्या शेती बागायतीला धोका निर्माण झालाय. बागायतीतील अनेक कल्पवृक्षाच्या झाडांनी जलसमाधी घेतली आहे आणि हे सर्व तालुक्याचे मामलेदार, खाण, भूगर्भ खातं उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्यापलीकडे ज्यांच्या संरक्षणासाठी सरकारी यंत्रणा आहे, तीच यंत्रणा कुचकामी ठरत आहे.

दिवसेंदिवस नदीचं पात्र रुंदावत चाललंय

मोपा उपसरपंच तथा जागृत युवक सुबोध महाले यांनी सांगितलं, आमचा या व्यवसायाला विरोध नाही. मात्र आमच्या शेती बागायतीची हानी झाली आहे. अनेक चौरस मीटर शेतजमीन नदीच्या पात्रात गेली आहे, ती सरकारने किंवा व्यावसायिकांनी परत द्यावी. दिवसेंदिवस नदीचं पात्र रुंदावत चाललं आहे.

पूल रस्त्यांनाही धोका

या दोन्ही नद्यांवर धारगळ-कोलवाळ पूल, रेल्वे पूल, हळर्ण पूल, वझरी-पीर्ण पूल, पोरस्कडे रेल्वे पूल, न्हयबाग-सातार्डा पूल, किरणपाणी-आरोंदा पूल असे पूल उभे आहेत. शिवाय न्हयबाग ते तोरसे पर्यंतचा राष्ट्रीय रस्ता याच नदीच्या काही अंतरावरून जात आहे. दोन वर्षांपूर्वी पोरस्कडे येथील रेल्वे पुलाच्या जवळचा शंभर मिटरचा रस्ता संरक्षण भिंतीसाहित तेरेखोल नदीत वाहून गेला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता रेल्वे पुलालाही धोका संभवतो. पेडणे तालुक्यात तेरेखोल आणि शापोरा नदीत परवाने नसताना अमर्याद रेती उपसा केला जातो. कोण कोण रेती व्यवसायात आहे याची पूर्ण माहिती पोलीस, मामलेदार आणि खाण भूगर्भ खात्याला आहे. ज्यावेळी रेती उपसावर धाडी टाकण्यासाठी अधिकारी येणार, त्या आधी व्यावसायिकांना कल्पना दिली जाते. या व्यवसायावर किमान ५ पाच हजार कुटुंबं अवलंबून आहेत. त्यात मजूर, मालक, ट्रक, गॅरेज व्यवसाईक, दुकानदार बाजारपेठा, लहानमोठे व्यवसाईक अवलंबून आहेत.

हेही वाचाः गोव्यातील महिलांना कॅन्सर होण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त

सरकार नुकसान भरपाई का देत नाही?

ज्या अर्थी खाण भूगर्भ खातं नियम आणि अटी घालून रेती  उपसा करण्यासाठी परवाने देतात, त्या अर्थी किनारी भागात होणारी पडझड आणि नुकसानीची पूर्ण जबाबदारी परवाने देणाऱ्या खात्याची असते. जी भगदाडे पडून आणि नदीचे पात्र रुंदावून बागायती शेतीच्या जमिनी नदीत जातात, त्यांना सरकार नुकसान भरपाई का देत नाही, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | BJP | भाजपच्या राष्ट्रीय महिला सरचिटणीस सुखप्रित कौर गोव्यात

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!