बुडालेल्या कुर्डी गावात कबर आली कुठून?

सोशल मीडियावर चर्चा; सरकारी अधिकाऱ्यांकडून स्थळाची पहाणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

सांगेः  साळावली धरणामुळे पाण्याखाली गेलेल्या कुर्डी गावातील नागरिक उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्यावर गतजीवनाच्या स्मृती पाहण्यासाठी तिथे जातात. काही हिंदू आणि ख्रिस्ती श्रद्धाळू जुन्या प्रार्थना स्थळांनाही भेट देतात. या गावात मुसलमान समाजाचेही लोक रहायचे, पण त्यांचं कोणतंच प्रार्थना स्थळ नव्हतं. मात्र, आता तेथे काहींनी नव्याने बांधकाम करत तिथे कबर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला असून समाज माध्यमांवर या कृतीमुळे चर्चेची वावटळ उठली आहे.

हेही वाचाः जीएमसीतून बाळाचं अपहरण केलेल्या महिलेला अटक

सोशल मीडियावर संशयकल्लोळ

तेथील मूळ रहिवासी असलेले सर्वच धर्मीय वर्षातून एकदा जाऊन कुर्डीतील जुन्या स्मृती जागविण्यासाठी सार्वजनिक प्रयत्न करतात. हिंदू आपल्या पद्धतीने श्री सोमेश्वर देवाची वार्षिक पूजा करतात. ख्रिश्चन धर्मीय आपल्या देवाची कुर्डीत जाऊन पूजा करत असतात, पण मुस्लिम धर्मीय कुर्डीत काही धार्मिक कृत्ये करीत असा अनुभव नाही. आंगडी – कुर्डी येथे मुस्लिम बांधवांची काही घरं होती, पण मशिद, दर्गा नव्हता. दफन केलेल्या कबरी होत्या. आता त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील काहीजण तिथे जाऊन कबरीवर चादर चढवून इतर धर्मियांप्रमाणे आपला वार्षिक उत्सव साजरा करू लागले आहेत. यंदा प्रथमच आणि नव्याने काही केलं असं नसून पूर्वीपासूनच आंगडी – कुर्डी येथे रहात असलेल्या लोकांच्या पूर्वाजांच्या कबरी पाहायला मिळतात. मात्र सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात संशयकल्लोळ माजला आहे. यंदा मुस्लिम धर्मियांनी आंगडीत लक्ष वेधून घेण्यासारखा प्रकार केल्याने सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. कबर जुनीच आहे. आजूबाजूला अनेक लहान मोठ्या कबरी आहेत, पण चादर चढविलेली कबर कोणाची ती गावातील लोकांना कोणालाच माहिती नाही, पण यंदा त्या कबरीच्या ठिकाणी ‘हजरत सय्यद सलाउद्दीन शहा काद्री’ असा नामफलक लावण्यात आला आहे. सोबतीला कबरी सभोवताली दगडी चौथरा रचला आहे. नव्याने सिमेंट बांधकाम केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेमुळे कुर्डीतील या स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी मामलेदार मनोज कोरगावकर, पोलिस निरीक्षक सचिन पन्हाळकर, गटविकास अधिकारी भगवंत करमली, तलाठी दामू नाईक उपस्थित होते.

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघातील सर्वसामान्यांना मिळणार मोफत सरकारी ऑनलाईन कागदपत्रे

जलसंपदा खात्याच्या दुर्लक्षपणामुळे कुर्डीत नको ते प्रकार

आंगडी – कुर्डी गावात पूर्वीपासून मुस्लिम समाजाची अवघीच घरं होती, पण धार्मिक उत्सव साजरा करण्याकरीता तिथे दर्गा, मस्जिद असा प्रकार नव्हता. केवळ मृत्यू झालेल्यांच्या कबरी होत्या, पण जलसंपदा खात्याच्या दुर्लक्षपणामुळे हल्ली कुर्डी गावात नको ते प्रकार घडू लागलेत. अजूनही कुर्डी गावात काही घरांचे अवशेष, तुळशी वृंदावन, मंदिरांचे गर्भगृह, देवतांच्या मूर्ती, लिंग, क्रॉस दिमाखात उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. याच जुन्या आठवणी कुर्डीवासीय आपल्या आजच्या पिढीला दाखवायला जात असतात, असं भाटी ग्रामपंचायतीचे पंच मनोज पर्येकर म्हणाले.

कुर्डी गावच्या सुरक्षेची जबाबदारी जलसंपदा खात्याची

सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या कुर्डीतील प्रकाराबद्दल पाहणी केली असता आंगडी येथे नव्याने बांधकाम करण्याचा प्रकार होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आंगडी गावात मुस्लिम लोक रहात होते. त्यांच्या कबरी आजही दिसून येतात. याचा अर्थ नव्याने कोणतेही बांधकाम करण्याचा परवाना कोणालाही दिलेला नाही. कुर्डी गावची सुरक्षा करण्याची जबाबदारी जलसंपदा खात्याची असून सर्व वाटा बंद गेट घालून सुरक्षा रक्षक तैनात करण्याची सूचना जलसंपदा खात्याला केली असल्याचं सांगेचे उपजिल्हाधिकारी सागर गावडे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!