खासगी टॅक्सी काऊंटरवरून अस्नोड्यात तणाव

कंत्राटी पद्धतीला विरोध; ‘महिंद्रा क्लब’ने माघार घेतल्यानंतर टॅक्सीवाल्यांचा वाद संपुष्टात

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः अस्नोड्यातील महिंद्रा क्लब हॉटेलच्या खासगी टॅक्सी काऊंटर विरोधात गावातील टॅक्सीवाल्यांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेतल्याने हॉटेल व्यवस्थापनाने काऊंटर उभारण्याचा निर्णय मागे घेतला. तसंच गावातील टॅक्सीवाल्यांनाच येथे व्यवसाय करण्यास मुभा दिली जाईल, असं ठोस आश्वासन व्यवस्थापनातर्फे मानव संसाधन अधिकारी हर्षद देसाई यांनी टॅक्सीवाल्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याने वादावर पडदा पडला.

हेही वाचाः ‘सरकराला फक्त निवडणुका जिंकायच्यात, त्यांना कोरोनाचं सोयरसुतक नाही’

खासगी कंत्राटी टॅक्सी काऊंटर उभारण्याचा निर्णय

महिंद्रा क्लब या हॉटेल व्यवस्थापनासोबत अस्नोडा पंचायतीने फेब्रुवारी २०१५ मध्ये नऊ कलमी सामंजस्य करार केला होता. त्यामध्ये कोणत्याही अटीशिवाय हॉटेलबाहेर स्थानिक टॅक्सीवाल्यांनाच व्यवसाय दिला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. हे हॉटेल याच महिन्यात चालू झालंय. लगेच हॉटेल व्यवस्थापनाने खासगी कंत्राटी टॅक्सी काऊंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यास स्थानिक टॅक्सीवाल्यांनी तीव्र विरोध दर्शवला. दोन-तीन दिवस स्थानिक टॅक्सीवाल्यांनी हॉटेल व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणीच दाद दिली नाही. शेवटी बुधवारी ११ वा. चर्चा करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिलं.

हेही वाचा – भयंकर! 24 तासांत 4 कोरोना बळी, 4 पैकी तिघांना फक्त कोरोनाची बाधा

आरंभी परिस्थिती बनली तणावपूर्ण

ठरल्याप्रमाणे बुधवारी सकाळी ११ वाजता टॅक्सीवाले हॉटेलबाहेर एकत्र जमले. सोबत त्यांचे कुटुंबीय आणि पंचायत मंडळाचे सदस्यही होते. पंचायत मंडळाला सोबत आणल्याचं कारण करत हॉटेलच्या मानव संसाधन अधिकाऱ्यांनी टॅक्सीवाल्यांना भेटण्यास नकार दिला. यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. टॅक्सीवाल्यांनी आपल्या गाड्या फाटकावर उभ्या करून हॉटेलचं प्रवेशद्वार अडवलं. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संयुक्त मामलेदार शैलेंद्र देसाई व म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा – Video | Exclusive | नव्या आरक्षणावरुन कोर्टात जाण्याचा दयेश नाईकांचा इशारा

संयुक्त मामलेदारांचा प्रस्ताव धुडकावला

संयुक्त मामलेदार शैलेंद्र देसाई यांनी गुरुवार, १८ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचा प्रस्ताव टॅक्सीवाल्यांसमोर ठेवला. मात्र, त्यांनी तो धुडकावून लावला. जोपर्यंत हॉटेल व्यवस्थापन या प्रश्नावर तोडगा काढत नाही, तोपर्यंत इथून हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यानं वातावरण तापलं. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने पाच जणांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यावर आंदोलकांनी पंचायत मंडळ व २० टॅक्सीवाले अशा ३० जणांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करावी, अशी मागणी केली. शेवटी पोलीस निरीक्षक लोटलीकर व संयुक्त मामलेदार देसाई यांच्या मध्यस्थीने दहा टॅक्सीवाले व पंचायत मंडळ या शिष्टमंडळासोबत अधिकारी हर्षद देसाई यांनी चर्चा केली व सायंकाळी वादावर पडदा टाकला.

हेही वाचा – 22 मार्चला निकाल लावू नका, थोडं थांबा, आमोणकर म्हणतात…

अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेकडून पाठिंबा

या आंदोलनाला अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेचे बाप्पा कोरगावकर, योगेश गोवेकर, चेतन कामत व इतरांनी पाठिंबा दिला. सरपंच शंकर नाईक यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यीय पंचायत मंडळ तसंच जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.

हेही वाचा – VIRAL FACT | चांदेल पेडणेत प्रवाशांचा बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास

मामलेदारांच्या सूचनेनंतर वादावर पडदा

अस्नोड्यातील स्थानिक टॅक्सीवाल्यांशिवाय इतर कोणत्याही खासगी टॅक्सी सेवेला हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. खासगी काऊंटर उभारला जाणार नाही. स्थानिक टॅक्सीवाल्यांनी टॅक्सी दराचा चार्ट सादर करावा. त्यानुसार सेवा दिली जाईल. गोवा माईल्स किंवा इतर अ‍ॅप आधारित टॅक्सीवाले हॉटेलवर आल्यास हा विषय स्थानिक टॅक्सीवाल्यांनी हाताळावा. त्यात हॉटेल व्यवस्थापनास गुंतवू नये, अशा अटी मामलेदार शैलेंद्र देसाई यांनी ठेवल्यानंतर वादावर पडदा पडला.

हेही वाचाः ‘कायद्यांमध्ये दुरुस्ती करून खाणी सुरू करा’

अस्नोडा पंचायत सदस्य सपना मापारी म्हणाल्या…

आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत हॉटेल व्यवस्थापन सोबत अस्नोडा पंचायतीने सामंजस्य करार केला होता. पण आता व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अस्नोडामध्ये हे एकमेव हॉटेल असून गावातील लोकांना रोजगारासाठी पहिलं प्राधान्य मिळावं, ही आमची मुख्य मागणी आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!