मेळावलीत चौथ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता

मेळावलीसोबत आसपासच्या गावातही पोलिस बंदोबस्त वाढवला गेलाय.

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः शेळ-मेळावलीत नव्याने चालू झालेल्या आंदोलनाच्या ८ जानेवारी या चौथ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता दिसून येतेय. सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावलीतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाविरोधात तेथील स्थानिकांचे गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिकांचा जोरदार विरोध सुरू आहे. जमिन संपादनास स्थानिकांचा विरोध आहे. या जमिनी सरकारी असल्याचा सरकार दावा करीत असले तरी पूर्वापारपासून या जमिनी कसत आलो आहोत आणि त्यामुळे या जमिनींचा अधिकार आमचा आहे,असा दावा करून स्थानिकांकडून या जमिनीच्या मालकीची मागणी होतेय. हा प्रकल्प अन्यत्र कुठेही हलवा, अशी मागणी स्थानिक करीत आहे.

शेळ मेळावलीतील आसपासच्या गावातही पोलिस बंदोबस्त

शेळ मेळावलीच्या आंदोलनाच्या आज चौथ्या दिवशी मेळावलीसोबत आसपासच्या गावातही पोलिस बंदोबस्त वाढवला गेलाय. खोतोडे जंक्शन, गुळेली जंक्शनवर मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाट तैनात केली गेलीये. सुमारे १००० पोलिस या ठिकाणी स्वतः जातीने हजर आहे. या पोलिसांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेशही आहे. गुळेली येथे पोलिसांच्या ५ गाड्या दाखल झाल्यात. मेळावलीमध्ये लोकांना ये-जा करण्यास पोलिसांचा अटकाव केलाय. शिवाय चित्रीकरण करणाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचं पोलिसांनी सत्र सुरू केलंय.

अटक सत्र सुरूच…

मेळावलीवासियांनी विरोध करताना दगडफेक केल्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल केलेत. तसंच मेळावलीवासियांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संखेने गोवेकरांना मेळावलीत हजर राहण्याचं आव्हानही केलंय. यामुळे आज पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. लोकांना ये-जा करण्यास अटकाव केलाय. यामुळे आज सकाळी गुळेलीत एकाला अटक करण्यात आलेली. मेळावलीवासियांना तो पाठिंबा देण्यास जात असल्याच्या संशयावरून त्याला पकडलेले. दुपारपर्यंत अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या दहा पर्यंत पोहोचलीये. गुळेली, खोतोडेत कारवाई करण्यात आलीये.

लोक गेले जंगलात

चार दिवस चाललेल्या आंदोलनात मेळावलीवासियांनी रस्त्यावर बसून आयआयटी प्रकल्पाला विरोध दर्शवलाय. आज मोठ्या प्रमाणात खोतोडे गुळेली जंक्शन येथे पोलिस फौजफाट तैनात करण्यात आलीये. यामुळे आज लोक रस्त्यावर बसले नाहीत. सगळे जंगलात गेलेत.

मुख्यमंत्री मेळावलीत चर्चेसाठी जाणार नाहीत…


मुख्यमंत्री शेळ मेळावलीत येऊन आमच्याशी बोलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असं शेळ मेळावलीवासियांनी सांगितलेलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपण शेळ-मेळावलीत येणार नसल्याचं सांगून आयआयटी प्रकल्प होणारच असं शेळ मेळावलीवासियांना प्रत्युत्तर दिलेलं. मुख्यमंत्री आपल्या या शब्दावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. मुख्यमंत्री शेळ मेळावलीत चर्चेसाठी जाणार नाहीत, पक्ष देखील मुख्यमंत्र्यांना तिथे पाठवणार नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!