कोलवाळमध्ये खासगी बसचा भीषण अपघात

दारूच्या नशेतील टेम्पो चालकाचा मृत्यू

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : कोलवाळमध्ये खासगी बसचा (GA-11 T-0554) भीषण अपघात झालाय. टेम्पोची (GA-01 T-5598) बसला समोरासमोर धडक बसल्यानं ही दुर्घटना घडली. हा अपघात दारूच्या नशेत असलेल्या टेम्पोचालकामुळे झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अपघातात त्याचा मृत्यू झालाय. बसमधील आठ महिला प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळालीय.

पत्रादेवी-पेडणे-म्हापसा या खासगी बसचा अपघात झाल्यानं वाहतूक काही काळ मंदावली होती. संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. म्हापशाहून पेडण्याच्या दिशेने जाणारी बस कोलवाळ-बिनानी इथं पोचली असता टेम्पोची समोरासमोर धडक बसली. यात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं. बसमधील जखमी प्रवाशांना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

चुकीच्या दिशेनं आल्यामुळं धडक

गोवा-मुंबई या महामार्गावर हा अपघात घडलाय. संध्याकाळची वेळ असल्यानं बस प्रवाशांनी भरलेली होती. टेम्पो चालक मद्याच्या नशेखाली होता, अशी प्राथमिक माहिती मिळतेय. चुकीच्या दिशेनं आल्यामुळं समोरून येणार्‍या बसला टेम्पोनं धडक दिली.

बसचालकानं हेडलाईट पेटवून सतर्क केलं, पण…

हा वन वे आहे. त्यामुळे समोरून चुकीच्या बाजूनं येणार्‍या टेम्पोचालकाला बसचालकानं हेडलाईट पेटवून सतर्क केलं. मात्र दारूच्या धुंदीत असलेल्या टेम्पोचालकाला ते न दिसल्यानं टेम्पोची धडक बसला बसली. या ठिकाणी वन वे असल्याबाबत दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. रस्ताचं कंत्राट घेतलेल्या एमव्हीआर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे असे अनेक अपघात होत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!