जीएमसीत ओपीडीसाठी आता फोनवर घेता येणार अपॉइंटमेंट?

ओपीडीसाठी टेलिफोन अपॉइंटमेंट सेवा सुरू; आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची माहिती

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोविडच्या दुसऱ्याने लाटेने लोकांना सळो की पळो करून सोडलंय. कोविड बाधितांची संख्या रोज नवनवे उच्चांक गाठताना दिसतेय. मृतांची संख्या तर चढ्या दिशेनेच चाललीये. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पण लोकांना अजूनही याचं गांभिर्य नाही. विना मास्क फिरणाऱ्यांची राज्यात कमी नाही. या सगळ्याचा विचार करून आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) ओपीडी सेवेच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

अपॉइंटमेंटसाठी टेलिफोन सेवा

कोविड बाधितांची वाढती प्रकरणं लक्षात घेता आरोग्यमंत्र्यांनी जीएमसीतील अपॉइंटमेंटच्या आधारे ओपीडीत रुग्णांना तपासलं जाणार असल्याचं मागेच सांगितलं होतं. आता अपॉइंटमेंट घेणं लोकांना सोपं व्हावं म्हणून पुन्हा एकदा दूरध्वनी सेवा सुरू करत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय. तशी माहिती देणारं ट्विट त्यांनी केलंय. तसंच कोविड महामारीच्या काळात बाहेरून येणाऱ्या रुग्णांना जीएमसीत सुविधा कोणत्याही त्रासाशिवाय दिल्या जातील याची खात्री आम्ही देतो, मात्र त्यासाठी आधीच अपॉइंटमेंट घेणं अपेक्षित आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करताना म्हटलंय.

ओपीडीत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी डायल करा ‘हा’ क्रमांक

जीएमसीत ओपीडीत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी एकूण 4 संपर्क क्रमांक देण्यात आलेत. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 0832-2495301 / 0832-2495331, 7588414291, 7588414924 यापैकी कुठल्याही क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी, पर्यायाने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ही अपॉइंटमेंट सेवा जीएमसीकडून सुरू करण्यात आली आहे.

गुरुवारी 21 जणांचा मृत्यू

गुरुवारच्या कोविड आकडेवारीनुसार 1410 नवे कोविड बाधित सापडले आहेत. तर 21 जणांचा कोविडमुळे मृत्यू झालाय. सध्या एकूण 10228 सक्रिय कोरोनाबाधित राज्यात आहेत, तर राज्याचा रिकव्हरी रेट हा 84.50 टक्के आहे.

या पार्श्वभूमीवर कोरोनाचं वेगाने फैलावणाऱ्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा दिवस रात्र झटतेय. आरोग्यमंत्री तसंच मुख्यमंत्री आपल्यापरीने होईल ते सर्व करतायत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!