गेट वे ऑफ इंडियाच्या तटबंदीला ‘तौक्ते’चा धक्का!

तटबंदीचे दगड निखळले ; कठडयाचा भागही कोसळला !

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या मुंबईमधील अपोलो बंदर भागातील पुरातन वारसा वास्तूचा दर्जा लाभलेल्या गेट वे ऑफ इंडिया परिसराचे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. गेट वे ऑफ इंडिया लगत समुद्राला तटबंदी रूपात उभारलेल्या धक्क्यांचे भलेमोठ्ठे दगड लाटांच्या माऱ्याने निखळले आणि दूर जाऊन पडले. तर गेट वे ऑफ इंडियाभोवती सुशोभीकरणासाठी उभारलेल्या कठडय़ाचा काही भागही लाटांच्या माऱ्यात निखळून पडला.

पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी १९११ मध्ये भारताला भेट दिली होती. या भेटीचे स्मारक म्हणून भव्य कमान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कमानीची पायाभरणी ३१ मार्च १९१३ रोजी करण्यात आली आणि १९२४ मध्ये ही वास्तू उभी राहिली. या वास्तूची रचना इंडो-सारासेनिक शैलीत करण्यात आली. या वास्तूची  उंची २६ मीटर (८५ फूट) इतकी आहे. अपोलो बंदर येथे उभारलेली ही वास्तू गेट वे ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाऊ लागली. देश-विदेशातील पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यालगत उभे असलेले गेट वे ऑफ इंडिया आकर्षणस्थान बनले आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे सोमवारी समुद्र खवळला होता.


समुद्राच्या लाटा रौद्ररूप धारण करून उसळत होत्या. उसळणाऱ्या लाटांचा मारा सतत गेट वे ऑफ इंडिया परिसरात होत होता. लाटांच्या तडाख्यामुळे गेट वे ऑफ इंडिया आणि समुद्रादरम्यान उभ्या केलेल्या तटबंदीचे दोन प्रचंड मोठे दगड निखळून दूर फेकले गेले. त्याचबरोबर गेट वे ऑफ इंडियाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी भोवती उभारलेल्या कठडय़ाच्या काही भागाचे लाटांच्या माऱ्यामुळे नुकसान झाले. लाटांसोबत आलेला कचरा गेट वे ऑफ इंडिया परिसरात पसरला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!