‘जीटीटीपीएल’नं लावली 9367 झाडं

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोव्याच्या समृद्ध जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेडनं (जीटीटीपीएल) गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्यानं उसगाव, सांगोड आणि कोडार या भागांत व्यापक वनीकरण मोहीम राबवली. वन खात्यानं निश्चित करून दिलेल्या जमिनीवर आतापर्यंत 9367 झाडे लावली आहेत.
तमनारमुळे वीजपुरवठ्याचा अतिरिक्त स्रोत
विजेचा तुटवडा हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासातील एक प्रमुख अडथळा बनलाय. गोव्याला वीजपुरवठ्याचा अतिरिक्त स्रोत निर्माण व्हावा तसेच विजेच्या गरजांबाबत स्वयंपूर्ण व्हावा, या हेतूनं वीज खात्यानं 2015 मध्ये गोवा-तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड (जीटीटीपीएल) प्रकल्प या आंतरराज्यीय ट्रान्समिशन यंत्रणा प्रकल्पाची आखणी केली.
तीन पटीहून अधिक झाडे लावली
या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सांगोड सबस्टेशनसाठी खासगी जमिनीवरील 2670 झाडे कापली गेली, ज्यासाठी गोवा सरकारच्या वन खात्याकडून सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या. कापलेल्या झाडांच्या बदल्यात वनीकरण करण्यासंबंधीच्या वन खात्याच्या नियमांनुसार कापलेल्या झाडांच्या तीन पट म्हणजे 8010 झाडं लावणं अपेक्षित आहे. या प्रकल्पाद्वारे त्याहून अधिक म्हणजे एकूण 9367 झाडे लावण्यात आली. वृक्षारोपण मोहिमेत लावण्यात आलेल्या सर्व फळझाडांची व्यवस्थित वाढ होईल, याचीही काळजी घेतली गेली आहे. भरपाईपोटी हाती घेतलेल्या या वृक्षारोपणासाठी वनखात्याने पुरवलेली प्रामुख्याने लाल मातीची जमीन वृक्षारोपणासाठी अनुकूल नव्हती. जीटीटीपीएलने या जमिनीवर सुपीक मातीची भर टाकून आणि ठिबक सिंचनाची व्यवस्था करून या वृक्षारोपण मोहिमेत लावण्यात आलेल्या सर्व फळझाडांची व्यवस्थित वाढ होईल, याचीही काळजी घेतली आहे.
औद्योगिक उलाढालींना मिळणार बळ…
जीटीटीपीएलने प्रकल्पाच्या आखणीपासूनच 400 केव्हि शेल्डे ट्रान्समिशन लाइनसाठी जमिनीचा पुरेपूर वापर व्हावा, याची खबरदारी घेतली आहे. मोले राष्ट्रीय अभयारण्याची जमीन टाळण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आला आहे. भगवान महावीर अभयारण्याचा अगदीच अटळ असलेला फक्त 2.51 किमी. भाग या प्रकल्पात समाविष्ट आहे. या प्रकल्पामुळे गोव्याच्या सध्याच्या विद्युत पुरवठ्याची क्षमता, दर्जा आणि विश्वासार्हता वाढणार आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यापारी उलाढालींनी, विशेषत: पर्यटन उद्योगाला बळ मिळणार आहे.