स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घ्या

कोरोनाचा सामना करण्यासाठी योग्य समन्वय आणि सिस्टीम घालून देणं ही काळाची गरज

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाचा कहर वाढत चाललाय. देशातील सर्वाधिक पॉझिटीव्हीटी रेट असलेलं राज्य गोवा बनलाय. इथे हे प्रमाण 51 टक्के आहे. प्रत्येक दोन व्यक्तीमागे एक व्यक्ती कोरोनाबाधीत सापडत आहे. हे प्रमाण तात्काळ खाली आणणं गरजेचं आहे. त्यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना आखावी लागेल. सरकारने 3 मेपर्यंत मर्यादीत लॉकडाऊन जारी केले आहे खरं. परंतु त्याचा मोठा उपयोग होईल, असं वाटत नाही. इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएने हे लॉकडाऊन पुढील पंधरवड्यापर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. सरकार मात्र तशा मनस्थितीत दिसत नाही. दुसरीकडे वाढत्या कोरोना प्रकरणांच्या तुलनेत आपल्या आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत. लोक आता बिथरले आहेत. लोकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. लोक जीव वाचवण्यासाठी इस्पितळात धाव घेऊ लागले आहेत. सर्वसामान्य नागरीकाला कुणीच वाली राहिलेला नाही आणि तो असहाय्य बनून आपल्या जीवासाठी धडपडताना दिसतो आहे. आरोग्य सुविधांत वाढ होणं गरजेचं आहेच. परंतु त्याचबरोबर कोरोनाचा सामना करण्यासाठी योग्य समन्वय आणि सिस्टीम घालून देणं ही काळाची गरज आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेतल्यास मोठा बदल घडू शकतो. 

मात्र प्रत्यक्षात वेगळात अनुभव

मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री यांच्याकडून कोरोनासंबंधीची अनेक वक्तव्य केली जातात. लक्षणं असलेल्यांनी अजिबात हयगय करू नये. वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री करतात. परंतु लोकांना मात्र प्रत्यक्षात वेगळाच अनुभव येतो. या आवाहनानुसार हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे खाटा नाही म्हणून त्यांना परतवलं जातं. आधीच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्यांना खाटा न मिळाल्याने स्ट्रेचरवर झोपून काढावं लागतात.

…आणि त्यातून या संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता

ऑक्सीजनची कमतरता हादेखील तेवढाच गंभीर विषय आहे. सरकार आपल्यापरीने हे सगळे विषय सोडविण्यासाठी प्रयत्न जरूर करतं. परंतु लोकांमध्ये चुकीचा अर्थ लावला जातो. न पेक्षा प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक नोंद सरकार दरबारी झाल्यास आणि त्यातून त्रृटी दूर झाल्यास त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. परंतु त्यासाठीची यंत्रणाच सरकारने तयार केलेली नाही आणि तशी तयारीही सरकारची नाही. कोरोना किटच्या बाबतीत सांगायचं झालं तर चाचणीसाठी जिथे लोक येतात तिथेच लक्षणं असलेल्यांना कोरोना किट देता येणं शक्य आहे. परंतु या किटसाठी त्यांना आरोग्य केंद्रात जावं लागतं. तिथे संबंधीत अधिकारी नसला तर ते किट मिळू शकत नाही. त्यात संबंधीत लक्षणं असलेली व्यक्ती कोरोनाबाधीत असेल तर ती व्यक्ती तशीच सगळीकडे फिरत राहते आणि त्यातून या संसर्गाचा प्रसार होण्याचीच अधिक शक्यता असते.

नगरपालिका, पंचायत पातळीवर पथक नेमण्याची गरज

प्रत्येक नगरपालिका किंवा पंचायत प्रभाग निहाय संबंधीत स्थानिक पंचसदस्य, नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करावं. हे पथक आपापल्या प्रभागातील लोकांची नोंद ठेवेल. तिथे किती लोक पॉझिटीव्ह आहेत, कितीजणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे, याची नोंद घेऊन तशा पद्धतीची सेवा देणं शक्य आहे. या पथकांचं समन्वयन करण्यासाठी एक सरकारी अधिकारी नेमावा जेणेकरून आपली दखल अगदी वरपर्यंत घेतली जात आहे, याचं समाधान प्रत्येकाला मिळू शकेल.

हेही वाचाः माणुसकी जिवंत आहे! डॉ. भाटीकरांची रुग्णवाहिक कोविड रुग्णांच्या सेवेत

स्वयंपूर्ण मित्रांच्या मदतीने कोरोना सहाय्यता पथक

सरकारने आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा या कार्यक्रमासाठी प्रत्येक पंचायतीसाठी स्वयंपूर्ण मित्र नेमले आहेत. कोरोना प्रकरणांमुळे तूर्त स्वयंपूर्ण मित्रांच्या कामाला स्थगीती दिली आहे. सरकारने याच स्वयंपूर्ण मित्रांच्या सहाय्याने प्रत्येक गावात एक कोरोना सहाय्यता पथक तयार करावं. या पथकात प्रत्येक प्रभागाचा पंच, नगरसेवक असावा. या प्रभागात कुणी सरकारी कर्मचारी असेल तर त्याला या पथकात सहभागी करून घ्यावं. या व्यतिरीक्त स्वेच्छेने कुणी स्वयंसेवक म्हणून काम करायला तयार असेल तर त्यांचाही समावेश करावा. या पथकाने आपापल्या प्रभागातील कोरोना रूग्णांवर बारीक नजर ठेवता येईल. त्यांना हवी असलेली मदत पोहचवणं किंवा त्यांना हवी असलेली आरोग्य सेवा पुरविण्याचं काम हे पथक करू शकेल. स्वयंपूर्ण मित्रांच्या सहाय्याने तालुकास्थरीय टीम, यानंतर जिल्हास्तरीय टीम आणि राज्यस्तरीय टीम अशा धर्तीवर एक नियोजनबद्ध यंत्रणा तयार करता येईल. एखादा रूग्ण स्वतःहून हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी किंवा अन्य उपचारांसाठी भटकण्यापेक्षा या टीमच्या सहाय्याने अशा लोकांचे समन्वयन केल्यास त्याचा मोठा लाभ आणि दिलासा लोकांना मिळू शकेल.

हेही वाचाः नर्सेसचे हाल थांबवा; राज्यातील सरकारी रुग्णालयांत मनुष्यबळ वाढवा

प्रत्येक पंचायतीसाठी आरोग्य अधिकारी

प्रत्येक पंचायतीसाठी एक आरोग्य अधिकारी नेमावा जेणेकरून हा आरोग्य अधिकारी 24 तास लोकांना फोनवरून मदत करण्यासाठी उपलब्ध असू शकेल. पंचायतनिहाय काही वाहनं तयार ठेवून गरज पडल्यास या वाहनांतून रूग्णांना हॉस्पिटल किंवा डॉक्टरकडे नेण्यासाठी उपयोग करता येईल, अशा पद्धतीची सोय करता येणं शक्य आहे. ही सगळी कामं तालुका मामलेदार किंवा उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत करता येणं शक्य आहे. ही एक सिस्टीम घालून दिल्यास त्याची योजनाबद्ध पद्धतीने कार्यवाही करता येणं शक्य आहे.

हेही वाचाःराजकारण बाजूला ठेवून गरजूंना मदत करा

मृतांवर अंतिम संस्कारासाठी वेगळी यंत्रणा

एखाद्या कुटुंबातील कुणी सदस्य दगावला असल्यास त्याचा मृतदेह घरी आणून त्याच्यावर योग्य पद्धतीने अंतिम संस्कार होतील, यासाठीही वेगळी यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. राज्यातील मृत्यूदराचं प्रमाण बघितलं तर ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरली आहे. एखाद्याच्या कुटुंबात कुणी व्यक्ती मरण पावल्यास तिथे कुणीच मदतीसाठी जात नाही. असं संकट कदापी कुणावर उदभवू नये, याची काळजी समाज म्हणून आपण घेणं गरजेचं आहे.

गावागावात जागृती वाहन

सरकारने तालुका मामलेदार किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्पूरता 50 हजार रूपयांचा निधी प्रत्येक पंचायतीसाठी मंजूर करावा आणि या निधीचा उपयोग या बारीक सारीक गोष्टींसाठी करण्याची तरतुद करावी. प्रत्येक पंचायतीत लोकांना आवाहन करणारे किंवा सरकारी निर्णयांची माहिती लोकांना करून देण्यासाठी दवंडी वाहनाची सोय करावी. ही जबाबदारी पंचायतीने घ्यावी. सरकारी पातळीवर घेतलेले वेगवेगळे निर्णय, लोकांनी घ्यावयायची काळजी तसेच अन्य महत्त्वाच्याबाबतीत ही जागृती वाहनं दिवसभर पंचायत क्षेत्रात फिरत राहतील आणि लोकांना माहिती देत राहतील, याची तजवीज करण्याची गरज आहे.

हेही वाचाः लॉकडाऊन वाढवणं गरजेचं नाही का?

स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घ्या

गावांतील प्रत्येक स्मशानभूमीत लाकडाची कमी राहणार नाही, याची काळजी किंवा जबाबदारी पंचायतीकडे द्यावी. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती चांगली असतेच असं नाही. परंतु कुणाचाही मृतदेह किंवा अंतिम संस्कार लाकडांसाठी किंवा अन्य गोष्टींसाठी लटकला अशी परिस्थिती कुणावर येऊ नये, याची काळजी पंचायतींनी घ्यावी. कोरोना महामारीच्या या व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेऊन सरकारने जिल्हा आणि राज्यस्तरीय योग्य व्यवस्थापन केल्यास मोठ्या प्रमाणात लोकांची होणारी गैरसोय टळू शकेल आणि लोकांना तात्काळ मदत मिळणे शक्य होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!