डॉ. अमोल तिळवे यांच्यावर कारवाई करा!

संशयित मिनेश नार्वेकर याची मागणी; पोलिसांना शरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: प्रसूती तज्ज्ञ डॉ. अमोल तिळवे यांना मारहाण केल्याप्रकरणी मुख्य संशयित मिनेश नार्वेकर (रा. पीडीए कॉलनी, पर्वरी) याने मंगळवारी पर्वरी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली. शरण जाण्यापूर्वी त्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन डॉ. तिळवे यांच्यावर गंभीर आरोप केले. या डॉक्टरांमुळेच आपल्या भाच्याचा जन्मतःच मृत्यू झाल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. तिळवेंचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणीही त्याने केली आहे.

हेही वाचाः POLITICS | जखम मोठी होण्याआधी ती नष्ट करणं गरजेचं

मारहाणीची ही घटना शुक्रवारची

मारहाणीची ही घटना शुक्रवार, २७ रोजी पर्वरीतील जेएमजे हॉस्पिटलात घडली होती. या इस्पितळात डॉ. तिळवे यांच्या देखरेखीखाली मिनेशच्या बहिणीची बुधवार, २५ रोजी प्रसूती झाली होती. तिला मुलगा झाला होता. नवजात बालकात जन्मजात काही दोष आढळल्याने त्याला प्रथम म्हापसा येथील खासगी हॉस्पिटलात आणि नंतर गोमेकॉमध्ये पुढील उपचारार्थ दाखल केलं होतं. तेथे २७ रोजी बालकाचा मृत्यू झाला होता. हाच राग मनात बाळगून मिनेश व इतरांनी जेएमजी हॉस्पिटलातील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) जाऊन डॉ. तिळवे यांना मारहाण केल्याची नोंद पर्वरी पोलिसांत करण्यात आली आहे. मिनेश व इतर ओपीडीत घुसले आणि त्यांनी डॉ. तिळवे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच काही वैद्यकीय उपकरणाची नासधूस केली, असे तक्रारीत म्हटलं आहे.

सोमवारी डॉक्टरांनी नेला पर्वरी पोलिस स्थानकावर मोर्चा

दरम्यान, संशयितांना अटक न केल्याच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेच्या वतीने सुमारे दोनशे डॉक्टरांनी पर्वरी पोलीस स्थानकावर मोर्चा नेला होता. त्यानंतर रात्रीच पोलिसांनी रोहील साळगांवकर, कृष्णा नाईक व रोहीश साळगांवकर या तिघांना अटक केली होती. दरम्यान, संशयित मिनेश याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी या अर्जावर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या अर्जावर निकाल येण्यापूर्वीच संशयित पोलिसांना शरण आला.

हेही वाचाः भाजपमधील अंतर्गत कलह वाढला!

डॉ. तिळवे यांच्यावर मिनेशचे आरोप…

– बहिणीच्या प्रसूतीवेळी डॉ. तिळवे यांच्याकडून निष्काळजीपणा झाला. यातून बालकाला ‘ब्रेन हॅमरेज’ होऊन त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार लपवून फक्त हृदयात दोष असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी अशाप्रकारे अनेक मुलांना मारले आहे, असं मिनेशने म्हटलं आहे.
– या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी कुटुंबीय गेले होते. त्यावेळी तसंच पोलिसांसमोर डॉ. तिळवे यांनी मला ठार मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीचं रेकॉर्डिंग आहे. यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मिनेश नार्वेकर याने केली आहे.

हा व्हिडिओ पहाः MISSION FOR LOCAL INITIATIVE | मिशन फॉर लोकलनं कोरगावात केली लोकसहभागातुन तळयाची स्वच्छता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!