स्वाभिमानी गोमंतकीय नेहरूंचे “अजीब है गोवा के लोग” हे शब्द पुन्हा खरे ठरवतील !

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीनं व्यक्त केला विश्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोमंतकीयांच्या संवेदना जाणणारा व भावनांचा आदर करणारा पक्ष म्हणुन गोमंतकीयांनी नेहमीच कॉंग्रेस पक्षावरच विश्वास ठेवला आहे. आता नव्याने गोव्यात राजकारण करु पाहणारे पक्ष केवळ धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट घालणार आहेत. गोमंतकीय राजकीय जुगार व करामतींना बळी पडणार नसुन, गोव्याची अस्मिता राखण्यासाठी ते पंडित नेहरूंचे “अजीब है गोवा के लोग” हे शब्द परत एकदा खरे ठरविणार आहेत, असे गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर व विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी आज जारी केलेल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे.

गोमंतकीयांना स्वाभिमान असुन, निवडणुकांसाठी भाजप विरोधी धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्याच्या कुटील डावांना ते कदापी पाठींबा देणार नाहीत.

गोव्याला आंदोलनांचा इतिहास असुन, गोव्याची अस्मिता राखण्यासाठी गोमंतकीय हातात हात घालुन नेहमीच उभा राहिला आहे. कॉंग्रेस पक्ष सन २०२२ मध्ये सत्ता स्थापन करणार असुन, गोमंतकीयांचा विरोध असलेले भाजप सरकारचे सर्व प्रकल्प व निर्णय आम्ही रद्द करणार आहोत.

कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी आज युवकांची रांग लागली असुन, जातीयवादी, असंवेदनशील व बेजबाबदार भाजपला पराभुत करणे केवळ कॉंग्रेसला शक्य असल्याचे आज प्रत्येक गोमंतकीयांना कळुन चुकले आहे. येणाऱ्या दिवसांत गोव्यात “कॉंग्रेस लाट” सर्वत्र दिसणार आहे.

गोव्याला कुणीही ग्राह्य धरू नये. आता परत एकदा गोव्यात बस्तान मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी यापुर्वी दोनदा असे प्रयोग करुन पराभव चाखले आहेत व यापुढे त्यांना पराभवच पहावा लागेल.

गोव्यात तृणमूल कॉंग्रेस विधानसभा निवडणुका लढविणार असल्याच्या त्यांच्या नेत्यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ” ममता दीदी या गोव्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्याचा मुर्खपणा करुन तृणमूलचे प्रथम विरोधक भाजपला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार नाहीत. गोव्यात राजकीय आत्महत्या करण्याचा निर्णय त्या घेणार नाहीत” असे मत व्यक्त केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय स्पंदनांचा अभ्यास करुन त्यावर लक्ष केंद्रीत केल्यानेच त्या सत्तेत राहु शकल्या. तळागाळात पक्ष बांधणी केल्याशिवाय राजकीय पक्ष उभा राहुच शकत नाही याची ममता बॅनर्जीना संपुर्ण जाणीव आहे. राजकीय पक्ष हा तळागाळातुन बांधला जातो. कृत्रीमरीत्या वरच्या स्थरावरुन बांधलेला राजकीय पक्ष तगच धरू शकणार नाही. राजकीय पक्ष हा कार्यकर्ते मजबुत करत असतात, लिडर व खास करुन डिलरनी उभे केलेले पक्ष कदापी यशस्वी होत नाहीत असे कॉंग्रेस विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!