संशयित सुभाष चंद्राला दिल्लीतून अटक…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : राज्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून ३ कोटींहून जास्त रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) मे. युदिवो प्रा. लि. कंपनीचे प्रमोटर सुभाष चंद्रा (४३) याला दिल्ली येथून आणून रविवारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
हेही वाचाःInterview | भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा डेव्हलपमेंट फॉर्म्यूला…
कंपनीने केली ९ एजंटची नियुक्ती
राज्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून मे. युदिवो प्रा. लि. कंपनीने ३ कोटींहून जास्त रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विभागाकडे गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, मे. युदिवो प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय कुमार जैस्वाल यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी फातोर्डा येथे कार्यालय उघडून गुंतवणूकदारांना तीन वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा व्याजाचे आमिष दाखवले. यात पहिली योजना ११ हजार गुंतवणूक केल्यानंतर सहा महिन्यानंतर २३,४०० रुपयांसह पुढील सात महिने २००० प्रती महिने देण्याचे आमिष देण्यात आले. दुसरी योजना १,२१,००० रुपये गुंतवणूक केल्यानंतर दहा महिन्यानंतर २,३४,००० रुपयांसह प्रतिमहिना ९ हजार रुपये देण्याचे आमिष देण्यात आले. तिसरी योजना २८,५०० रुपये गुंतवणूक केल्यानंतर दहा महिन्यानंतर प्रतिमहिना २ हजार रुपये, त्यानंतर १२, १८ व्या महिन्यात २० हजार रुपये देण्याचे व इतर वेगवेगळ्या योजनांद्वारे आमिष दाखविण्यात आल्याचे म्हटले. तसेच त्यासाठी कंपनीने ९ एजंटची नियुक्ती केली होती. त्यानंतर काही काळ गुंतवणूकदारांना वेळोवेळी ठरल्याप्रमाणे परतावा दिला.
हेही वाचाःगोवन वार्ता लाईव्ह वेबसाईटच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त…
विजय कुमार जैस्वाल या संशयिताला अटक
कंपनीने या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांची सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक करून कार्यालय बंद करून पळ काढला. त्यानंतर कंपनीने फसवणूक केल्याचे समजल्यानंतर गुंतवणूकदारांनी विभागात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन विभागाचे पोलीस निरीक्षक राजाशद शेख यांनी राज्यातर्फे तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक पराग पारेख यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय कुमार जैस्वाल, त्याची पत्नी रश्मी जैस्वाल, सुभाष चंद्रा यांच्यासह ९ एजंटांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६,४०९,४२०,५०६(ii) व १२० बी आणि गोवा ठेवीदार व्याज संरक्षण कायद्याचे कलम ३ व ५ आणि बक्षीस, चिट आणि पैसा अभिसरण योजना (बंदी) कायद्याचे कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणी विभागाने विजय कुमार जैस्वाल या संशयिताला अटक केली होती. त्यानंतर कंपनीचा प्रमोटर संशयित सुभाष चंद्रा उत्तर पूर्व दिल्ली येथे असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, विभागाचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पारेख यांच्या नेतृत्वाखाली हवालदार दशरथ वायंगणकर, हनुमंत नाईक, कॉ. कृष्णा वळवईकर, नागराज पाटील व इतर पथक १९ सप्टेंबर रोजी रवाना झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले.
हेही वाचाः१३ जणांना आमिष दाखवून ७.३२ लाख रुपयांचा गंडा…
गोव्यात आणून अटकेची कारवाई
आर्थिक गुन्हा विभागाने संशयित चंद्रा याला २३ रोजी ताब्यात घेऊन फर्शबाजार पोलीस स्थानकात हजर केले. त्यानंतर न्यायालयात हजर करून दोन दिवस ट्रान्झिट रिमांड घेऊन रविवारी गोव्यात आणून अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
हेही वाचाःभाजप सोडण्याचा माझा निर्णय चुकीचा : मायकल