मुख्यमंत्र्यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट करणाऱ्या संशयितास अटक

मथुरेतून केली अटक; संशयिताकडे सापडले सुमारे २०० सीमकार्ड्स

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावे बनावट फेसबूक खातं उघडून नागरिकांकडून पैसे मागण्याच्या प्रकरणात मोहम्मद साकीर हुसैन (मथुरा, उत्तर प्रदेश) या संशयिताला अटक करण्यात आलीये. या संशयिताला गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने मथुरा – उत्तर प्रदेशातून अटक केलीये. अटक करण्यात आलेल्या संशयिताकडून सुमारे २०० मोबाईल सीम जप्त करण्यात आलेत. संशयिताला मंगळवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचाः दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळणे खाणीवर बंदी

संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद

गोवा पोलिसाच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावे बनावट फेसबूक खातं उघडून नागरिकांकडून पैसे मागण्याचे प्रकार गेले काही दिवस होत होते. याची माहिती प्रथम सायबर विभागाला मिळाली होती. त्यानंतर या प्रकरणी प्राथमिक चौकशी करून तसंच मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाला संपर्क साधून सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्वेश सावंत यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन विभागाने अज्ञात व्यक्ती विरोधात २० जुलै रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९,४२० आर डब्ल्यू ५११ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ सी आणि ६६ डी नुसार गुन्हा दाखल केला होता. तसंच तपास सुरु केला होता.

हेही वाचाः मगोप नेते डॉ. केतन भाटिकरांवर हल्ला

मथुरा-उत्तर प्रदेशातून अटक

दरम्यान विभागाला अशा प्रकारचे गुन्हे मेवट – हरयाणा आणि मथुरा – उत्तर प्रदेश या भागातून होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शानाखाली आणि पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक देवेंद पिंगळे, हवालदार योगेश खांडेपारकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मयुर राणे हे पथक ३१ रोजी उत्तर प्रदेशातील मथुरात रवाना झालं.

हेही वाचाः पंतप्रधान मोदींनी लाँच केले e-RUPI

२०० मोबाईल सीम जप्त

या वेळी पोलीस कॉन्स्टेबल संजय शेट्ये आणि नाजीर सय्यद यांनी गोव्यातून मदत पुरवली. त्यानंतर पथकाला मेवट – उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारनिया यांनी आवश्यक मदत दिल्यानंतर पथकाने संशयिताचा पाठलाग करून रविवारी त्याला ताब्यात घेतलं. यावेळी संशयिताकडून सुमारे २०० मोबाईल सीम जप्त करण्यात आलेत. सोमवारी संशयिताला गोव्यात आणून रितसर अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः बांद्यात होऊ शकतं, मग दोडामार्गात का नाही ?

अटक करण्यात आलेल्या संशयिताला मंगळवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!