सुरेंद्र सिरसाट यांचं निधन, आज अंत्यसंस्कार

वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : म्हापशाचे माजी आमदार तथा माजी सभापती प्रा. सुरेंद्र सिरसाट यांचे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास येथील खासगी इस्पितळात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित पुत्र, विवाहित कन्या, बहीण व पुतणे-पुतणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता दत्तवाडी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

यकृताच्या त्रासानं असह्य

सिरसाट यांना यकृताचा त्रास जाणवत होता, त्याचा परिणाम होऊन त्यांचे अन्य अवयवही निकामी होत गेले. शनिवारी अचानक रक्तदाब कमी होत गेल्याने शिरसाट यांना म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी सायंकाळी गोमेकॉच्या तीन सदस्यीय डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला होता. उपचार सुरू असतानाच रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

पत्रकारीतेतून करिअरला सुरुवात

सिरसाट यांनी पत्रकारितेतून करिअरला सुरुवात केली होती. ज्ञानप्रसारक उच्च माध्यमिक विद्यालयाचे ते बराच काळ प्राचार्य होते. अलिकडच्या काळात ‘गोवन वार्ता’च्या संपादकीय पानावर ते ‘ज्ञान सरिता’ सदरासाठी लेखन करत होते. म्हापशातील ज्ञानप्रसारक उच्च माध्यमिक विद्यालयाचे ते बरोच काळ प्राचार्य होते. मगोचे अध्यक्ष होते.

राजकीय कारकीर्द

प्रा. सुरेंद्र सिरसाट हे १९७७ साली पहिल्यांदाच म्हापसा मतदारसंघातून महाराष्ट्रावादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर १९८९ आणि १९९४ साली ते पुन्हा मगोच्या तिकिटावर निवडून आले होते. १९९० साली त्यांची गोवा विधानसभेचे सभापती म्हणून निवड झाली होती. कालांतराने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!