‘संडे सेलिब्रेशन’ पडलं महागात ; आंबोलीत पर्यटकांवर कारवाई

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबोलीत अजूनही आहे पर्यटनाला बंदी !

Goan Varta Live | प्रतिनिधी

आंबोली (विनायक गांवस ) : पावसाळा सुरू झाला की गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या हौशी पर्यटकांना आंबोलीचा रोमहर्षक धबधबा साद घालतो. त्यातल्या त्यात संडे सेलिब्रेशन आंबोलीत नाही झालं तर काहीच मजा नाही. सध्या मात्र कोविडनं हा आनंद हीरावून घेतलाय. आंबोलीत अद्याप पर्यटकांना परवानगी नाही. आज संडे सेलिब्रेशनसाठी अनेकांनी आंबोलीच्या धबधब्यात मनमुराद भिजण्याचा आनंद घेतला खरा, पण पोलिसांनी या आनंदावर विरजण टाकलंय. आंबोलीत आलेल्या पर्यटकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलीय.

निसर्गानं आच्छादलेलं सहयाद्रिच्या खो-याचं एक नितांतसुंदर प्रतिबिंब म्हणजे आंबोली. पावसाळा सुरू झाला की आंबोलीचं रूप असं काही खुलतं की एकदा आलेल्या प्रत्येकालाच वर्षा पर्यटनासाठी आंबोलीचीच ओढ लागते. विशेषत : गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातले अनेक हौशी पर्यटक वर्षा पर्यटनासाठी आंबोलीचे अक्षरश: दिवाणे आहेत. गेल्या वर्षीपासुन मात्र या हौशी पर्यटकांची घोर निराशा होतेय. कोविडमुळं सध्या सिंधुदुर्ग जिल्हयात पर्यटनाला बंदी आहे. याही वर्षी अद्याप हा आदेश कायम आहे. मात्र याची कल्पना अनेकांना नव्हती. त्यामुळं पावसाला सुरू झाल्यानंतरचा संडे सेलिब्रेट करण्यासाठी या हौशी पर्यटकांची पावलं आंबोलीकडं वळली. तिथं पोहोचल्यानंतर मात्र अनेकांना बंदी असल्याची माहिती मिळाली. ज्यांना माहिती नव्हती त्यांना आपला जल्लोष सोडून पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं.

आंबोलीत आलेल्या पर्यटकांपैकी अनेकांना पोलिसांनी परत घालवलं तर दहा जणांवर कोविड नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. दरम्यान, आंबोली इथल्या पर्यटन व्यवसायावर स्थानिकांचा वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबुन असतो. त्यामुळं जुलैपासून इथ पर्यटन खुलं करण्यात यावं, अशी मागणी पर्यटन व्यावसायिक काका भिसे यांनी केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!