बाबुशचा दानशुरपणा कुठे गेला ?

सुदीप ताम्हणकरांचा सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविडच्या पहिल्या लाटेवेळी लोकांकडूनच पैसे गोळा करून रेशन देणारे बाबुश मोन्सेरात आजच्या घडीला दुसऱ्या लाटेत लोकांना इस्पितळाच्या खाटा आणि ऑक्सिजन देण्यात कुठे कमी पडले. आपल्याच सरकारवर टीका करून आपले अपयश लपवण्याचा खटाटोप करणाऱ्या बाबुश मोन्सेरात यांचा दानशुरपणा आता कुठे गेला,असा सवाल आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी केलाय.
आपण बाबुश मोन्सेरात यांच्यावर टीका का करतो,असा प्रश्न अनेकांना पडणार. आपण पणजी महानगरपालिका आणि पणजी मतदारसंघाचे मतदार आहोत. पणजीचे आमदार या नात्याने बाबुश मोन्सेरात हे पूर्णपणे अपयशी ठरलेत. राज्यभरात मोठे दानशुर अशी शेखी मिरवणारे बाबुश पणजी, ताळगांवकरांचे जीव वाचवू शकत नाहीत. ताळगाव कम्यूनिटी हॉलचे रूपांतर स्पेपअप इस्पितळात करून त्यांना गरजूंना आधार दिला असता तर त्यांना खरोखरच मानले असते. ताळगाव आणि पणजी परिसरात अनेक खाजगी इस्पितळे आहेत. त्यांचीही सहज मदत त्यांना घेता आली असती. काँग्रेस पक्षातून लोकांचा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाजपात दाखल झालेले बाबुश मोन्सेरात आता लोकांना काय तोंड दाखवणार,असा टोलाही ताम्हणकरांनी लगावला.

विश्वजितची सुपारी बाबुशला मिळाली

राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून याच काळात आरोग्य खाते काढून घेण्याचा घाट सरकारात घालण्यात आलाय. याची सुपारी बाबुश मोन्सेरात यांच्याकडे दिलीए. काही काळापूर्वी विश्वजित राणेंवर स्तूतीसुमने उधळणारे बाबुश मोन्सेरात आजच्या घडीला अचानक विश्वजित राणेंच्या मागे लागलेत. वास्तविक त्यांच्या या टीकेमागचा बोलवता धनी वेगळाच आहे आणि ते संपूर्ण गोव्याला माहित आहे. कोविडमुळे मरण आलेल्या लोकांचा एवढाच पुळका बाबुश मोन्सेरात यांना असता तर त्यांनी आपल्या पत्नीला या सरकारातून राजीनामा देण्यास भाग पाडले असते. किमान त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी मंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली असती. स्वतःची त्यांची पत्नीच त्यांच्या या आरोपांना पाठींबा देत नसताना जनतेचा त्यांच्या या मागणीला पाठींबा मिळूच कसा शकेल,असे सुदीप ताम्हणकर म्हणाले.

हायकोर्टानंच गुन्हा दाखल केला असता

ऑक्सिजनच्या विषयावरून खुद्द मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात सुनावणी सुरू आहे. एवढे करून बाबुश मोन्सेरात आपल्या एका नगरसेवकाला पुढे करून आरोग्यमंत्र्यांच्या विरोधात पणजी पोलिस स्थानकांत तक्रार दाखल करतात. ऑक्सिजनच्या या गैरव्यवस्थेला आरोग्यमंत्री जबाबदार असते तर खुद्द हायकोर्टानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी केले असते. मुख्यमंत्री जसं म्हणतात की ते लोकांच्या टीकेला भीत नाहीत कारण कोविड महामारी पहिल्यांदाच आलेली आहे. आत्तापर्यत जीएमसी किंवा इस्पितळांना इतके ऑक्सिजन लागेल, ही वेळही पहिल्यांदाच आली आहे आणि त्यामुळे केवळ आरोग्यमंत्र्यांवर खापर फोडून सगळे नामानिराळे होऊ पाहत आहेत,अशी टीका ताम्हणकर यांनी केलीए.

गैरव्यवहारांची जरूर चौकशी करावी

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोविडचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध हवेत,अशी मागणी कधीपासून केली होती. त्यांच्या या मागणीचा कुचेष्टा करण्यात आली. आरोग्यमंत्री या नात्याने त्यांनी खबरदारीचे उपाय सुरू केले होते परंतु मुख्यमंत्री या नात्याने डॉ. प्रमोद सावंत यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. इथे कुणाची बाजू घेण्याचा किंवा कुणावर आरोप करण्याचा प्रश्न नाही. कोविडचे व्यवस्थापन करण्यात भाजप सरकार सपशेल अपयशी ठरलंय. आता लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी तसेच लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा आरोप प्रत्यारोपांचा बनाव केला जात आहे. ह्यात बाबुश मोन्सेरात यांचा जोकर म्हणून वापर केला जातोय,असं ताम्हणकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!