SUCCESS STORY | वालेंतिनोचे शेतीतील कमाल प्रयोग

जायचं होतं परदेशी, वळला शेतीकडे; वालेंतिनोचा गवतकापणी यंत्रापासून सर्व्हिस प्रोव्हायडरपर्यंतचा प्रवास; दहा वर्षे करतोय शेती

अजय लाड | प्रतिनिधी

मडगाव: आयुष्यात काही गोष्टी या सांगून घडत नाहीत, तर त्या योगायोगाने घडत जात असतात. असाच परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकाला शेतीतून उत्पन्नाचा मार्ग मिळाला व त्याचं आयुष्यच बदलून गेलं. मूळ राय येथील व सध्या घोगळ मडगाव येथे वास्तव्यास असणारा वालेंतिनो रेमंड रॉड्रिग्ज याने एका गवतकापणी मशीनपासून सुरू केलेला आणि आता कृषी क्षेत्रातील (सर्व्हिस प्रोव्हायडर) सेवा पदापर्यंतचा दहा वर्षांचा प्रवास युवकांना आदर्शवत ठरणारा असाच आहे.

असा पोहोचला कृषी क्षेत्रात

राय येथील वालेंतिनो रॉड्रिग्ज हे मशागतीसाठी यंत्र उपलब्ध करून देतात. त्यांच्याकडे भात खरेदीसाठीची एजन्सी असून शेतीत सतत विविध प्रयोग करून उत्पन्न वाढवण्याच्या ते प्रयत्नात आहेत. कृषी क्षेत्रातील प्रारंभापासूनचा प्रवास सांगताना वालेंतिनो म्हणाले की, तीनवेळा परीक्षेला बसल्यावर बारावी पास झालो. त्यानंतर काही काळ हॉटेल क्षेत्रातही काम केलं. मात्र, त्याठिकाणी मिळणारी वागणूक कधीच आवडली नाही. त्यानंतर पारंपरिक जमिनीतील मशागतीसाठी गवत कापणी यंत्र विकत घेतलं. त्यावेळी राय येथील पंचायतीचं काम मिळालं व त्यानंतर आणखी मागणी येत गेली. त्यामुळे मिळणाऱ्या पैशातून आणखी एक मशीन विकत घेत एक कामगारही नेमला व कामं करण्यास सुरुवात केली. पावसाळ्यात काम मिळत नसल्यानं राय सांतिमळ येथील पारपंरिक पण १८ वर्षे पडिक जमीन कसण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी मानशीचं पाणी भरत असल्यानं कुणी पॉवर टिलर देण्यास तयार झाला नाही. त्यामुळे जमवलेल्या पैशांत काही भर टाकून पॉवर टिलर खरेदी केला व मशागत केली. ते काम पाहून पॉवर टिलरला मागणी येत गेली व दुसऱ्या हंगामात आणखी एक पॉवर टिलर घेतला.

हेही वाचाः ‘स्मार्ट व्हिलेज’मुळे कृषी क्षेत्रात येऊ शकते नवचैतन्य

आत्मविश्वासाच्या जोरावर धुंडाळली नवी वाट

मडगावातील कृषी प्रदर्शनात भेटलेल्या फादर जॉर्ज कार्दोज यांनी यांत्रिक भातलावणीची माहिती दिली. त्यानंतर राय बागभाट येथील दुसऱ्या शेतकऱ्यांची एकहजार चौरस मीटर जमीन घेऊन शेती करत त्यातून 800 किलो भाताची लागवड केली. काही जणांकडून थट्टाही झाली व त्याकडे दुर्लक्ष करत वाटचाल केली. दोन वर्षांपूर्वी सुमारे 15 शेतकऱ्यांकडून 40 हजार चौरस मीटर जमीन भाडेतत्त्वावर घेत शेतजमीन कसली. सध्या आठ ग्रासकटर, दोन पाण्याचे पंप, दोन भातलावणी यंत्रे, तीन पॉवर टिलर एवढे साहित्य आपणाकडे असून याशिवाय हंगामानुसार मिरची, वांगी, भेंडी, भोपळा अशी उत्पादनंही घेत असल्याची माहिती वालेतिंनोनी दिली.

हेही वाचाः ‘एक जिल्हा एक कृषी उत्पादन’, नारळ आणि फणसाची निवड

फादर जॉर्ज, कृषी खात्याचे सहकार्य

फादर जॉर्ज काद्रोज यांच्याकडून शेतीत नवे प्रयोग करण्याचे मार्गदर्शन व भातलावणी यंत्र घेण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. भातलावणी यंत्र घेताना पैशांची अडचण आली. मात्र कृषी विभागाच्या संचालकांपासून कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचं सहकार्य मिळालं. 2019 मध्ये पहिल्या वर्षी भातलावणी यंत्रानं माझ्याच शेतीत काम केलं व येणाऱ्या अडचणी पाहिल्या. त्यानंतर दुसऱ्या हंगामात शिरोडा व राय परिसरातूनही ऑर्डर मिळाल्या. त्यावर्षी 70 हजार चौरस मीटर शेतीत यंत्राद्वारे लावणी केली व पुढील हंगामात काम वाढल्यानं दुसरी भातलावणी मशीन घेतली. कृषी खात्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्यानंच हा टप्पा गाठता आल्याचंही वालेंतिनो यांनी सांगितलं.

शेतीत योग्य मार्गदर्शनानं चांगलं उत्पन्न

लॉकडाऊनच्या कालावधीत दोन कामगार ओरिसा येथे गेले. त्यांना परत येणं शक्य झालं नाही. त्यावेळी संजय हा एकच कामगार उपलब्ध होता. त्यावेळी केपेतील बोटीवर काम करणारा व लॉकडाऊनमुळे अडकलेला वालेंसिओ व त्याच्यासोबत ग्लेम यांना कामाची हौस असल्यानं त्यांना मशीन चालवण्यास शिकवलं. वडिलांचंही खूप सहकार्य मिळतं. भविष्यात आणखी दोन भातलावणी मशीन घेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. खरीप हंगामात सुमारे 3 लाख चौरस मीटर जमिनीवर लावणी केली. वर्षाला साधारणत: पाच लाखांचं उत्पन्न मिळतं, असं सांगत तंत्रज्ञानाचा वापर करत शेती केल्यास व नवे प्रयोग केल्यास नक्कीच चांगलं उत्पन्न मिळतं. त्यामुळे युवकांनी शेतीकडे वळावं, असंही वालेंतिनो रॉड्रिग्ज यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!