नरकासुरा रे नरकासुरा! नरकासुराची ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

सण उत्साहाने साजरे होतात, पण त्यामागचा इतिहास काय सांगतो?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : लेखक आणि इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी नरकासुरावर एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी नरकासुराबाबत काही महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. नरकासुराबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती आणि त्या माहितीच्या आधारे आपलं एक मत मांडलं आहे. नरकासूर गोव्यात मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. रात्र जागवली जाते. पहाटे त्यांचं दहन केलं जातं. या सगळ्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे… ती म्हणजे…

ही नरकासुराची कथा!

महात्मा बळीची कथा जशी धुसर करत नेली गेली तशीच नरकासुराचीसुद्धा गत आहे. नरकासुराची कथा अवतरते महाभारतात व नंतर विस्तृत स्वरुपात हरीवंशात. आधी आपण नरकासुराच्या उपलब्ध काहे कथांचा आढावा घेऊ!

पहिली कथा, नरकासूर – पृथ्वीचा अधिपती

भागवतानुसार नरकासूर हा भुदेवीचा पुत्र होता. बाणासुराच्या सहकार्याने त्याने प्राग्ज्योतिषपुरचा (आसाम) राजा घटकासुराला हटवून स्वत:चे राज्य स्थापन केले. विष्णुचा एक भविष्यातील अवतार नरकासुरास नष्ट करेल अशी भविष्यवाणी असल्याने भुदेवीने विष्णुचीच प्रार्थना करून त्याच्यासाठी दिर्घायुष्य आणि तो सर्वशक्तीमान असावा असे वरदान मागितले. शक्तीने उन्मत्त झालेल्या नरकासुराने सरळ स्वर्गाकडेच मोर्चा वळवला आणि देवांना पळवून लावले. अशा रितीने नरकासूर स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिपती बनला व त्याने 16 हजार स्त्रिया (अथवा राजकन्यांना) पळवून प्राग्ज्योतिषपूर येथे बंदिवासात ठेवले. सर्व भयभीत देव मग विष्णूकडे गेले व या आपत्तिपासून सुटकारा मागितला. विष्णुने आपण नरकासुराला दिर्घायुष्य दिले असल्याने कृष्णावताराच्या वेळीस त्याला ठार मारू असे देवांनाही वरदान दिले. नरकसुराचा जन्म वराह अवताराच्या वेळीस झाला असेही ही कथा म्हणते. वराहानंतर कृष्ण अवतारापर्यंत किती कालावधी लोटला असेल याची कल्पना करा! तोवर विष्णुने देवांना स्वर्गाबाहेरच ठेवले, मधल्या, रामावतारानेही काहीच केले नाही असेच ही कथा सुचवत नाही काय?

कृष्णाला नरकासुराबाबत मात्र काहीच माहित नव्हते. त्याला नरकासुराच्या स्त्रीयांवरील अन्यायाची माहिती सत्यभामेकडून समजली. कृष्णाने पाठोपाठ गरुडावर बसून प्राग्ज्योतिषपुरच्या नरकासुराच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. नरकासुरही ११ अक्षोहिन्यांचे सैन्य घेऊन कृष्णावर तुटून पडला. पण शेवटी कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडवले. मरण्यापूर्वी नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की आपल्या मृत्युदिवसाचे स्मरण पृथ्वीतलावरील लोकांनी विशेष दीपप्रज्वलन करून सण साजरा करून करावे. त्या स्मृतिदिनालाच आपण नरक चतुर्दशी समजतो.

कृष्णही इंजर्ड?

याच कथेची वेगळ्या स्वरुपात अजून एक पण थोडी वेगळी कथा येते. नरकासुराशीच्या युद्धात कृष्ण जखमी होऊन बेशुद्ध पडला. यामुळे संतप्त सत्यभामेने दुप्पट आवेशाने युद्ध केले व त्यात अखेरीस नरकासूर ठार झाला. येथेही मरण्यापुर्वी त्याने सत्यभामेकडे वरीलप्रमाणेच वरदान मागितले. म्हणजे नेमके कोणाकडुन नरकासुराला मारलेले दाखवावे याचा संभ्रम पुराणकथाकारांच्याही मनात होता.

नरकासुराने बंदीवासात ठेवलेल्या या सोळा हजार स्त्रियांशी नंतर कृष्णानेच विवाह केला असे मानले जाते! या स्त्रीया (किंवा राजकन्या) कोणाच्या व कोठकोठल्या होत्या याचा उल्लेख नाही आणि किती काळ त्या बंदीवासात होत्या याचाही उल्लेख नाही! कारंण नरकासुराने (हे कथा खरी मानली तर हजारो वर्ष राज्य केले!) बरे, सर्व पृथ्वीवर त्याचे राज्य असते तर रामाचे, रावणाचे कौरवांचे, जरासंघाचे अणि जनकादि अन्य शेकडो राजांचे राज्य भारतात कोठून आले असते? एवतेव ही भाकडकथा मुद्दाम बनवण्यात आली हे उघड आहे.

नरकासूर आणि कामाख्याची कथा

ही झाली पुराणकथा. शाप- वरदानकथा भाकड असतात व सणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अथवा जुने माहात्म्य पुसट करण्यासाठी बनवलेल्या असतात हे उघड आहे. मिथके तयार करून इतिहास धुसर केला जातो. वैदिक त्यात किती चतूर होते हे सर्वांना माहितच आहे. मुख्यत्वे या कथेकडे असूर आणि वैदिक संस्कृतीतील संघर्षातुन पहावे लागते. वैदिक साहित्यात पुर्वेकडील व दक्षीणेकडील सर्व प्रदेश असुरांनीच व्यापला असल्याचे म्हटले आहे. (शतपथ ब्राह्मण). कामरुप हे शाक्त तांत्रिकांचे एक पुरातन केंद्रस्थान होते. नरकासूर आणि कामाख्याची एक कथा भ्रष्ट स्वरुपात आजही अवशिष्ट आहे. ती पाहता तो शक्तीभक्त होता यात शंका राहत नाही. त्याला भुदेवीचा पुत्र दाखवून तेवढे स्मरण पुराणकारांनी ठेवले. महाभारत युद्धात नरकासुराचा पुत्र भगदत्त कौरवांच्या बाजुने लढला असे म्हटलेले आहे. पण महाभारत आजच्या रुपात बनले तेच मुळात चवथ्या शतकात आणि हरिवंश लिहिले गेले ते सहाव्या-सातव्या शतकात. महाभारतात जवळपास आशिया खंडातील सर्वच राजे या ना त्या बाजुने सामील झाले होते असे लिहिलेले आहे. ते ऐतिहासिक मानता येत नाही.

नरकासुराची बदनामी?

कृष्णाचे म्हणावे तर तोही असुरच होता. यदुवंश असुराच आहे हे महाभारतावरुनाही स्पष्ट दिसते. बाणासुराच्या राज्यातील असूर कन्यकांशी विवाह करायला यादव गणातील किती तरुण धावले व खुद्ध बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, कृष्णपुत्र अनिरुद्धाने कसा विवाह केला याचे वर्णन महाभारतातच येते. कृष्णाचे वैदिकीकरण करतांनाही मिथके जोडली तरी मुळचे वास्तव लपवता आले नाही. बाणासूर महात्मा बळीचा पुत्र मानला जातो व तोही महान शिवभक्त होता. असुरश्रेष्ठांना बदनाम करण्यातील मोहिमेचा भ्रष्ट कथा बनवणे हा एक भाग आहे असे स्पष्टपणे म्हणता येते. थोडक्यात पुराणकथांनी नरकासुराला बदनाम करत मुळचे नरकासुराचे रुप विकृत केले आहे. असे असले तरी त्याच्या नांवाचा विशेष दिवस प्रतिवर्षी साजरा होतो, त्यात खंड पडलेला नाही व त्याच्या स्पष्टीकरणासाठीच मरण्यापुर्वी त्याने तसे वरदानच मागितले होते अशा स्पष्टीकरण कथा बनवल्या गेल्यात हे उघड आहे.

नरकारसुराला कुणी मारलं?

प्रत्यक्षात आसाममध्ये आजही नरकासुराचा सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे. कामरुपावर सत्ता गाजवणा-या अनेक घराण्यांनी आपला पुर्वज नरकासुरास मानले आहे. गौहत्तीच्या दक्षीणेकडील एका पर्वतास त्याचे नांव आहे. कामाख्या मंदिराशी नरकासुराच्या अनेक दंतकथा (चांगल्या अर्थाने) निगडित आहेत. म्हणजे, कधीही झाला असो, असूर शैव संस्कृती प्रबळ असण्याच्या काळात आसाममद्धे नरकासूर होऊन गेला असावा. पुर्वेकडील बालेय देश (म्हणजे बळीवंशाने स्थापन केलेली राज्ये) व त्याहीपलीकडील असुरांचीच राज्ये ही वैदिक धर्माच्या प्रसाराला अडथळा होती. त्याबाबत अनेक तक्रारी शतपथ व ऐतरेय ब्राह्मणात नोंदवलेल्या दिसतात. पण नरकासुराचे नांव या दोन्ही ब्राह्मणांत येत नाही. येते ते उत्तरकालीन साधनांत व विपर्यस्त स्वरुपात. त्याच्या मृत्युशी कृष्णाचा संबंध जोडणे अनैतिहासिक आहे कारण मुळात त्या युद्धाची कथाच दोन वेगवेगळ्या रुपात येते. ती खरी असती तर अशी वेगळी संस्करणे दिसली नसती.

म्हणजेच असले युद्ध काही झाले नाही. नरकासुराला कोणी युद्धात मारले नाही. त्याला कोणी भविष्यातील अवतार घेईपर्यंत निरंकुश राज्य करण्याचे दीर्घायुष्याचे वरदानही दिले नव्हते कि त्याच्या नांवाने कोणता तरी सण लोक साजरा करतील असे विधानही केले नव्हते. कीर्तिवंत नीतिमान असूरश्रेष्ठ म्हणुनच लोकांनी स्वयंस्फुर्तीने त्याला बळीसोबतच त्याचे माहात्म्य दिले. म्हणजे तो पृथ्वीचा सम्राट नव्हता. स्वर्गाचा त्याने पराभव केला म्हणजे वैदिकांचा पराभव केला एवढाच मिथ्थकथेचा अर्थ . त्याचे राज्य कामरुपापर्यंत मर्यादित होते. तो बाणासुराचा समकालीन असू शकतो, पण भाकड पुराणकथांतून तसा ठाम निष्कर्श काढता येत नाही.

संदर्भ काय सांगतात?

दुसरे असे कि व्रतराजामध्ये नरकचतुर्दशी या काम्य व्रताची माहिती येते. हाही अत्यंत उत्तरकालीन व्रते सांगणारा ग्रंथ असला तरी यात नरक चतुर्दशीला नरकासुराच्या नांवाने दिवे लावत, व्रतकर्त्याच्या कुलात जेही कोणी अग्नीत दग्घ होऊन मेले असतील वा जे अदघ्धच राहिले असतील या सर्वांना परगती मिळो अशी प्रार्थना चूड पेटवून करावी असे म्हटले आहे. या व्रताची सांगता शैव ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देवून करावी असेही म्हटले आहे. या व्रतात नरकासुराची कोणतीही कथा सामाविष्ट नाही.

नरकासूराचा संबंध “नरक” या पापी मृतात्म्यांना यातना देण-या लोकाच्या नांवाशी जोडला जातो. मुळात “नरक” या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. यास्कानेही ती केलेली नाही. हा शब्द मुळचा संस्कृतातील नाही असे स्पष्ट दिसते. तरीही मोठ्या कष्टाने ती शोधण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला आहे. Comparative etymological Dictionary of classical Indo-European languages (Rendich Franco) मद्ध्ये “क” म्हणजे प्रकाश. आनंद. उत्साह. (मूळ धातू “काश” पासून अर्धांग का घेतले तर.)

शब्दांची फोड आणि त्याचा अर्थ

नर म्हणजे माणुस व अक हा शब्द लागून नरक…म्हणजे आनंदविहिन माणूस असा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याचा व नरकाच्या वर्णनाशी काही संबंध नाही हे उघड आहे. खरे तर त्याने नर+क=आनंदी-उत्साही माणुस असा अर्थ का घेतला नाही? कि नरक हा शब्द्च मृत्युशी जोडला गेल्याने नाईलाजाने त्याने तसे केले?

L Renou यांनी “वैदिक निऋतीतून निर्रया – निर्रका- नारक- नरक असा प्रवास झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. (“Language of the Nirukta” तळटीप -मंत्रीनी प्रसाद) पण ही व्युत्पत्ती निरर्थक अशीच आहे. निऋतीवरून नैऋत्य दिशेचे नांव आले असे म्हटले जाते पण नरकासुराच्या राज्याची दिशा ती नाही. तर या शब्दाची व्युत्पत्ती अनिश्चित असल्याचे “Pali-English Dictionary” (Thomas William Rhys Davids, William Stede) एवतेव नरक हा शब्द मुळचा वैदिक दिसत नाही तसेच त्याचा अर्थही आज घेतला जातो तसाच मुळचा असण्याची शक्यता नाही.

नवी दृष्टी… नवा विचार

थोडक्यात नरकासूर ही एक ऐतिहासिक, दंतकथा बनलेली पण महान, अशी व्यक्ती असावी. आसाममद्ध्ये राज्य करत असतांनाही देशव्यापी किर्ती त्याने निर्माण केली, इतकी कि आजही आपण देशभर नरकासुराचे स्मरण करतो, भलेही ते वैदिक कलमांमुळे विपर्यस्त स्वरुपात असो! शिव-शक्तीच्या या देशातील पुरातन संस्कृतीने आपले अस्तित्व निरपवाद टिकवले आहे. प्रश्न फक्त त्यांवरील वैदिक पुटे काढण्याचा आहे. आणि यांच्या भोंगळ कथांत एवढ्या विसंगत्या आहेत कि ते सहजशक्यही आहे. नरकासुराच्या पाठोपाठ आपण महात्मा बळीचे पुजन करतो…नववर्ष सुरू करतो ते उगीच नाही. वैदिक कलमे केलेल्या कथा विपर्यस्त असल्याने सांस्कृतिक गोंधळ निर्माण झाला आहे आणि तो सर्वांनी मनातून काढायला हवा व नवीन दृष्टीने नरकासुराकडे पहायला हवे!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!