आंदोलक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
पणजीः कोविडच्या पार्श्वभूमीवर 10वी-12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी गेले काही दिवस विद्यार्थ्यांकडून निदर्शनं केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी विद्यार्थी त्यांच्या मागण्या घेऊन पर्वरीत गोवा बोर्डाच्या बाहेर दाखल झाले. इथून त्यांनी आपला मोर्चा आल्तिनोतील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या बंगल्यावर नेला. यावेळी पोलिसांनी एनएसयूआय गोवाच्या कार्यकर्त्यांसोबत या मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं.

एनएसयूआयकडून विद्यार्थ्यांना पाठिंबा
मागचे काही दिवस परीक्षा पुढे ढकलण्यासाठी 10वी-12वीचे विद्यार्थी करत असलेल्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सोमावारी एनएसयूआयचे कार्यकर्ते गोवा बोर्डाच्या बाहेर पोहोचले. 10वी-12वीचे विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याची करत असलेल्या मागणीला त्यांनी दुजोरा दिला. इथे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी कुणी तयार नसल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचा मोर्चा आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने वळवला.
40 विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
10वी-12वीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी घेऊन विद्यार्थी सोमवारी आल्तिनोतील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या बंगल्याच्या बाहेर पोहोचले. परीक्षा पुढे ढकला अथवा ऑनलाईन घ्या, या मागणीवर विद्यार्थी अडून बसले. पोलिसांनी दटावूनही विद्यार्थी मागे हटण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांनी एनएसयूआय गोवाच्या 2 कार्यकर्त्यांसोबत मोर्चात सहभागी झालेल्या ४० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं.

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी
जगात कोविड-19 आजाराची दुसरी लाट असून राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेय. रविवारी कोविड बाधित मिळण्याची दिवसभरातील संख्या 951 एवढी होती. त्यामुळे गोवा सरकारने याकडे लक्ष केंद्रित करून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा त्या ऑनलाईन माध्यमातून घ्याव्यात, अशी मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थी गेले कित्येक दिवस करतायत. राज्यात सध्या कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी लस देण्यात येत आहे. पण दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणार असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.